शेंदुरजनाघाटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई:60 लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांना घेतले ताब्यात
![]()
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली होती. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीवर लक्ष केंद्रित करून पोलिसांनी सापळा रचला होता. या मोहिमेअंतर्गत वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथे दोन मोठे हायवा (टिप्पर) पकडण्यात आले. पोलिसांनी एमएच २७, बीएक्स ५२३८ आणि एमएच ४०, बीजी ३९०९ क्रमांकाचे हायवा तसेच त्यातील वाळू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान विठ्ठल उईके, किशोर वानखडे, किशोर बेलसरे, शेख जमीर शेख हबीब, शेख आरीफ आणि सय्यद अख्तर या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक डी.एल. मोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक सागर नाठे, शांताराम आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
