नवापूर बर्ड फ्लू अपडेट:सहाव्या दिवशीही 'कलिंग' जोरात; अडीच लाखांहून अधिक पक्षी, तर 9 लाख 27 हजार अंडी नष्ट
![]()
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सहाव्या दिवशी ‘अमलीवाला पोल्ट्री फार्म’मधील 23,707 कुक्कुटपक्षी, 1 लाख 20 हजार अंडी आणि 46 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले. 30 एप्रिल रोजी बर्ड फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 47 हजार 174 पक्षी नष्ट केले. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. समीर काजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे पासून सुरू झालेल्या या कलिंग ऑपरेशनमध्ये आतापर्यंत मोठी कारवाई करण्यात आली आहे: नष्ट केलेले पक्षी: 2,47,174, नष्ट केलेली अंडी: 9,27,922, नष्ट केलेले 9 पोल्ट्रीतील पशु खाद्य 28.62 मॅट्रिक टन. पोल्ट्री फार्ममधील कलिंगचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र, प्रशासनाने आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. बाधित क्षेत्रापासून 1 किलोमीटरच्या परिघातील गावांमधील देशी कोंबड्या, बदके, पोपट व इतर पाळीव पक्ष्यांचा सर्व्हे पशुसंवर्धन विभागामार्फत केला जात आहे. हे सर्व पक्षी जमा करून त्यांच्या कलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनातर्फे ग्रामीण भागातील आदिवासींना प्रत्येक कुक्कुट पक्षामागे 150 रुपये अनुदान तात्काळ देण्यात येत आहे. मात्र, या निर्णयावर स्थानिक आदिवासी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आमचा मुख्य व्यवसाय शेती आणि कुक्कुटपालन आहे. बाजारात एका पक्ष्याला 500 ते 700 रुपये मिळतात, पण शासन फक्त 150 रुपये देत आहे. ही मदत अत्यंत कमी असून आम्हाला किमान 500 रुपये नुकसान भरपाई मिळावी,” अशी मागणी स्थानिक पालकांनी केली आहे. नवापूर परिसरातील आणखी तीन पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कलिंग ऑपरेशनच्या पुढील दिशेबाबत आणि व्याप्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
