महाराष्ट्र पोलिसांसाठी 'एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म':गुन्हे तपासात 'एआय' आणि 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर




महाराष्ट्र पोलिसांच्या ताफ्यात लवकरच एक अत्याधुनिक यंत्रणा सामील होणार आहे. गुन्ह्यांचा तपास अधिक काटेकोर, पारदर्शक आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा बनवण्यासाठी ‘एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म’ विकसित केला जात आहे. राज्य सरकारच्या ‘मार्व्हल’ (MARVEL) या विशेष उद्देश संस्थेद्वारे ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली तयार केली जात आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीला राज्यातील दोन पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक तत्त्वावर केला जाईल. या पायलट प्रोजेक्टमधील अनुभव आणि यश पाहून त्याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाईल. या दोन पोलीस युनिट्सची निवड पोलीस महासंचालक कार्यालयाकडून केली जाईल, अशी माहिती मार्व्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. पोद्दार यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, ‘एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म’मध्ये प्रामुख्याने पाच महत्त्वाची वैशिष्ट्ये असतील. यामध्ये तक्रारदार, पीडित किंवा साक्षीदारांचे ऑडिओ-व्हिज्युअल निवेदन थेट लिखित स्वरूपात रूपांतरित करण्याची सोय उपलब्ध असेल. तसेच, ही प्रणाली स्वयंचलित पद्धतीने तपासाचा एक निश्चित रोडमॅप तयार करेल. हा रोडमॅप पोलीस दलाची प्रमाणित कार्यपद्धती आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयांनी दिलेल्या दिशानिर्देशांवर आधारित असेल. या प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, संबंधित प्रकरणातील मुद्देमालाची सुरक्षा आणि डिजिटल पुराव्यांचे जतन करण्यासाठी अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे तपासात पुराव्यांबाबत येणाऱ्या तांत्रिक समस्या आणि फेरफार पूर्णपणे टाळता येतील. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढेल. यामुळे पोलीस ठाण्यांमधील नोंदणी प्रक्रिया वेगवान होईल आणि तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दाखल होणाऱ्या आरोपपत्रांची कायदेशीर छाननीही या प्रणालीद्वारे शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *