राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर:नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-06t201141087_1778078540.jpg




नवापूर तालुक्यातील ढोंग परिसरात आज दुपारी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे जोरदार वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि आलेल्या चक्रीवादळाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत घरांचे पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून, शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. ​दुपारच्या सुमारास आलेल्या या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, ढोंग गावातील अनेक कच्च्या घरांवरील छपरे आणि पत्रे कागदासारखे हवेत उडून गेले. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. घरात पावसाचे पाणी शिरल्याने धान्य आणि कपड्यांचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ​वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात उभी असलेली पिके आडवी झाली आहेत. हातातोडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या बळीराजासमोर आता या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. ​चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण यंत्रणेला बसला आहे. वादळामुळे परिसरातील अनेक मोठे वृक्ष उन्मळून विद्युत वाहिन्यांवर पडले, तर काही ठिकाणी विद्युत पोल जमिनीदोस्त झाले आहेत. यामुळे ढोंग गावासह परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज खांब मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे, परिणामी आजची रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागणार आहे. “निसर्गाच्या या थैमानामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकरी व ग्रामस्थांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी,” अशी आर्त हाक ढोंग परिसरातील ग्रामस्थांनी दिली आहे. भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी नवापूर तालुक्यात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका सोसणाऱ्या ग्रामस्थांना आज दुपारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील ढोंग, सांगाळी, नवापाडा, पांगरण आणि शिर्वे या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी झाड उलमडून पडली आहे. राजगड तालुक्यात मोठे झाड कोसळले राजगड तालुक्याला जोडणाऱ्या वेल्हे-नसरापूर मुख्य मार्गावर जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अडवली गावच्या हद्दीत मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन प्रवाशांचे हाल झाले; मात्र अडवली गावचे माजी सरपंच मोहन काटकर यांनी तत्काळ पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला केले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सायंकाळच्या सुमारास आलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेले धान पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या अस्मानी संकटामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जळगावातही पावसाची हजेरी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधीसह अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे वाढत्या उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा आनंद शेतकऱ्यांसाठी चिंतेचा ठरला असून, मका, ज्वारी यांसारख्या काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed