![]()
पुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ऑलिम्पिक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात पुणे शहर व जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक खेळाडू, ऑलिम्पियन्स, क्रीडा शिक्षक आणि मान्यवर सहभागी झाले होते. या दिनानिमित्त शनिवारवाडा येथे मान्यवरांच्या हस्ते ‘क्रीडा ज्योत’ प्रज्वलित करून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये पुरंदरे प्रतिष्ठानचे घोडेस्वार पथक, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडा रथ, विद्यार्थ्यांचे बँड पथक, स्केटर्स आणि सायकलस्वार यांचा शिस्तबद्ध सहभाग होता. खेळाडूंनी रॅलीच्या मार्गावर मर्दानी खेळ, स्केटिंग आणि सायकलिंगची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. शनिवारवाड्यातून निघालेली ही रॅली दगडूशेठ गणपती मंदिर, लक्ष्मी रोड, अलका टॉकीज चौक मार्गे टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पोहोचली. मैदानावर राष्ट्रीय खेळाडूंनी ही क्रीडा ज्योत पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजूषाताई नागपूरे यांच्याकडे सुपुर्द केली. यानंतर मुख्य सोहळ्याचे दीपप्रज्वलन करण्यात आले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्यात पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते व पद्मश्री मुरलीकांत पेटकर, माजी ऑलिम्पियन बाळकृष्ण आकोटकर, मारुती आडकर, मनोज पिंगळे, अंजली भागवत, रेखा भिडे, विक्रम पिल्ले, तसेच अर्जुन पुरस्कार विजेते गौरव नाटेकर, श्रीरंग इनामदार यांसह अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. मैदानावर योगासन, तायक्वांदो, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब आणि किकबॉक्सिंगची रोमांचक प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. यावेळी बोलताना महापौर मंजूषा नागपूरे म्हणाल्या की, पुणे हे विद्येचे माहेरघर असण्यासोबतच एक संपन्न क्रीडानगरीही आहे. येथील गुणवान खेळाडूंना पुणे महानगरपालिका नेहमीच सर्वतोपरी मदत करेल. त्यांनी पुणे मनपाच्या ‘पुणे प्रथम’ मोहिमेअंतर्गत खेळाडूंना खेळात मोठी प्रगती करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यास उपमहापौर परशुराम वाडेकर, क्रीडा समिती अध्यक्ष नारायणराव गलांडे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, क्रीडा उपायुक्त संतोष टेंगळे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी व विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यात जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा:3 हजारांहून अधिक क्रीडापटूंचा सहभाग, शनिवारवाड्यातून रॅलीची सुरुवात
