![]()
लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने ‘साप-साप’ असे ओरडत नाटक करत, केतनला मिठी मारून वेळ मारून नेली होती. हा धक्कादायक खुलासा खुद्द केतनच्या वडिलांनी केला असून, या कटात सियाचे कुटुंबीय देखील सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. केतनच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजीची बालीची ट्रिप रद्द झाल्यानंतर सियाने केतनसोबत खूप भांडणे केली आणि लोहगडला जाण्याचा हट्ट धरला. त्यानुसार १४ जून रोजी केतन आणि सिया दोघेच लोहगडवर गेले होते. तिथे गेल्यावर संधी साधून सियाने पहिल्यांदा केतनला किल्ल्यावरून खाली धक्का दिला. मात्र सुदैवाने केतनच्या हाती एक झुडूप लागल्याने तो बचावला. केतन वाचल्याचे पाहताच सियाने तत्काळ ‘साप आला… साप आला’ असे ओरडत नाटक सुरू केले आणि केतनला मिठी मारली. सापाला घाबरून सियाने चुकून धक्का दिला असावा, यावर केतनने भाबडेपणाने विश्वास ठेवला. मात्र, सियाचा तो त्याला संपवण्याचा पहिला प्रयत्न होता, हे आता उघड झाले आहे. बाली प्री-वेडिंग शूटचा कट: स्वतःच लपवला पासपोर्ट हत्येच्या या कटाची सुरुवात जून महिन्याच्या सुरुवातीलाच झाली होती. केतनच्या वडिलांनी सांगितले की, ६ जून रोजी केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. विमानतळावर जाण्यासाठी निघालेल्या गाडीत केतन, सिया, केतनची बहीण आणि सियाचा भाऊ साहिल असे चौघे होते. प्रवासाला निघताना सर्वांचे पासपोर्ट, चलन आणि क्रेडिट कार्ड एकाच पाऊचमध्ये ठेवण्यात आले होते. वाटेत एका फूडमॉलवर थांबले असता, सिया ‘मोबाईल गाडीत राहिला’ असा बहाणा करून एकटीच गाडीजवळ गेली आणि परत आली. त्यानंतर विमानतळावर पोहोचल्यावर केवळ केतनचाच पासपोर्ट गायब असल्याचे निदर्शनास आले. तो खूप शोधूनही न सापडल्याने सर्वांना माघारी फिरावे लागले. सियानेच मुद्दाम तो पासपोर्ट गायब केला होता, हे आता स्पष्ट होत आहे. १८ जून: ‘प्री-बर्थडे’च्या बहाण्याने नेऊन संपवले केतनच्या वडिलांनी सांगितले की, १४ जूनचा प्रयत्न फसल्यानंतर, सियाने १९ जून रोजी असलेल्या तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधले. ‘माझा प्री-बर्थडे साजरा करूयात’ असा हट्ट धरून तिने १८ जून रोजी केतनला पुन्हा लोहगडवर नेले. सकाळी ८.२० वाजता ते घरातून निघाले. यावेळी सियाचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी हा त्यांच्या पाठीमागे २०-२५ फुटांवरून फिरत होता. किल्ल्यावर वर पोहोचल्यानंतर सिया आणि चेतनने संगनमत करून केतनला दरीत ढकलून दिले. पावणे अकरा वाजता सियाच्या आईने केतन दरीत पडल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. सियाच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता! केतनच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही लोहगडवर पोहोचलो तेव्हा स्थानिक आणि पोलिसांनी मृतदेह शोधून काढला होता. मात्र, ज्या मुलीचा भावी नवरा डोळ्यांसमोर दरीत पडून वारला आहे, तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा किंवा धक्क्याचा कोणताही भाव नव्हता. सियाच्या या निर्विकार प्रतिक्रियेमुळेच केतनच्या कुटुंबाला पहिल्यांदा संशय आला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या तपासात सिया आणि चेतन चौधरी यांचे नोव्हेंबरपासून अफेअर असल्याचे आणि ते दोघे ‘हनिमून’लाही जाऊन आल्याचे उघडकीस आले. ३५-४० वर्षांची ओळख, पण असा घात करतील वाटले नाही केतनचे वडील म्हणाले, केतन आणि सियाचा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने (अरेंज मॅरेज) ठरला होता. दोन्ही कुटुंबांची गेल्या ३५-४० वर्षांपासून ओळख होती. मात्र, सियाच्या अफेअर आणि भानगडींबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला माहिती होती, तरीही त्यांनी जाणीवपूर्वक आमची फसवणूक केली, असा आरोप केतनच्या वडिलांनी केला आहे. “एका २० वर्षांच्या मुलीला कुणाचा तरी जीव घेण्याचे संस्कार कसे मिळू शकतात? यात तिचे आई-वडील, भाऊ किंवा इतर नातेवाईक सामील असू शकतात,” असा संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी या दुर्दैवी पित्याने केली आहे.
लोहगडवरील हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा:14 जूनलाही झाला होता केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न! वडिलांचे गंभीर आरोप
