सातारा गुन्हेगारी वृत्त:कोडोली येथे बहिणीच्या घरी भावाची चोरी; अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-25t165915467_1777116522.jpg




सातारा शहराजवळील कोडोली परिसरात बहिणीच्या घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बहिणीने स्वत:च्या भावाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून दि. २३ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपीने फिर्यादीच्या बॅगेतून घराची चावी चोरून घेत घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैजण, लहान पैजण, बांगड्या, वाळे व कानातले असा एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अश्विनी तात्यासो देशमुख (वय २८, व्यवसाय – खाजगी नोकरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या कोडोली येथील गणेश हॉस्पिटलजवळ एका घरात भाड्याने राहत आहेत. संशयित आरोपी समाधान तात्याबा इंगळे (रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस हवालदार पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा विडणी (ता. फलटण) येथील १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांत विडणीतील युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (दि. २३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या युवतीच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. विशाल दादा जाधव (रा. मांगोबामाळ, विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. पोलिस हवालदार कांबळे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. संगमनगर येथे अवैध दारू विकणाऱ्या वर गुन्हा सातारा ते कोरेगाव रोडलगत असणाऱ्या संगमनगर येथील कॅनॉल रोडवर अवैध दारु विक्री व वहातूकप्रकरणी दारु विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी दुपारी सातारा शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ऋषीकेश दिपक शिंदे (वय-२४, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कराड) असे याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी दारुच्या सुमारे दोन हजाराच्या ९० बाटल्या तसेच ५० हजार रुपयांची मोपेड दुचाकी असा एकूण ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातारा शहर पोलिसांत घटनेची नोंद झाली असून पोलिस हवालदार श्री. मोहिते हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. विश्वास संपादन करून चार लाख रुपये लाटले : एकावर गुन्हा कोंडवे (ता. जि. सातारा) येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीने घरमालक व त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तब्बल ४ लाख २७ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ ते दि. १३ मार्च २०२६ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी सागर शर्मा ऊर्फ केदारनाथ सागर शर्मा हा फिर्यादी यांच्या फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. त्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा तसेच नातेवाईकांचा विश्वास संपादन केला. यानंतर विविध कारणे सांगून आरोपीने अनेकांकडून पैसे उकळले. यामध्ये विजय कांबळे यांच्याकडून गाडी खरेदी, घरभाडे व रेल्वे तिकीट या कारणांसाठी १ लाख ७६ हजार ३०० रुपये, अरुण साळुंखे यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये, विवेक मिलिंद गंभरे यांच्याकडून ५० हजार रुपये, प्रविण सदाशिव कांबळे यांच्याकडून १० हजार रुपये तसेच विहार गायकवाड यांच्याकडून ८१ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. एकूण ४ लाख २७ हजार ३०० रुपये घेतल्यानंतर संशयित आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विजय सदाशिव कांबळे (वय ४२, रा. वृंदावन पोलीस टाऊनशिप, सातारा, मूळ रा. आगलावेवाडी, ता. जावळी) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सागर शर्मा ऊर्फ केदारनाथ सागर शर्मा, रा. इंदिरानगर कॉलनी, सीताफळमंडी, वारसीगुडा, सिकंदराबाद, हैदराबाद (तेलंगणा) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार घोरपडे अधिक तपास करत आहेत. एटीएम कार्ड बदलून वयोवृध्दाची ४८ हजारांची फसवणूक सातारा शहरात एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून तब्बल ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून जीवन बापू जावळे (वय ६८, रा. वर्ये, ता. जि. सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आय.डी.बी.आय. बँक, पोवई नाका, सातारा येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे एक व बाजूला एक असे दोन अनोळखी इसम उभे होते. यातील एका इसमाने फिर्यादीचा एटीएम पिन नंबर पाठीमागून पाहिला, तर दुसऱ्या इसमाने हातचलाखीने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलून त्यांना बँक ऑफ बडोदाचे दुसरे कार्ड दिले. त्यानंतर दि. १८ रोजी सकाळी ६.४४ वाजण्याच्या सुमारास तामजाईनगर, करंजे तर्फ सातारा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून फिर्यादीच्या खात्यातून एकूण ४८ हजार रुपये काढण्यात आले. त्यानंतर वर्ये यांची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed