साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई:बेकायदेशीर पिस्टलसह 20 वर्षीय तरुण जेरबंद, 65 हजारांचा मुद्देमालही हस्तगत
![]()
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. आरोपीकडून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हर्षद सुनील भोसले (वय 20, रा. आझाद नगर, मोळाचा ओढा, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोळाचा ओढा परिसरातील राजपुरोहित दुकानासमोर एक इसम पिस्टलसारखे अग्नीशस्त्र घेऊन उभा असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक कुमार ढेरे व त्यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. झडती दरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक कुमार ढेरे व त्यांच्या पथकाने केली.
