अजित पवारांच्या अपघाताआधी अघोरी पूजेचा दावा:अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे खळबळ; विधी आणि अपघाताचा संबंध?
![]()
राज्यात अघोरी प्रथांबाबत सुरू असलेल्या चर्चेत आता नव्या दाव्यांची भर पडली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकारांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अपघातापूर्वी काही ठिकाणी अघोरी पूजा करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये बारामतीतील सहयोग घर, काटेवाडी येथील निवासस्थान आणि विद्या प्रतिष्ठान परिसरात अघोरी विधी झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला की, असे प्रकार बाहेरून आलेल्या व्यक्तींना करणे शक्य नसून, यामागे स्थानिक पातळीवरील काही प्रभावशाली व्यक्तींचा हात असू शकतो. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मिटकरी यांनी डिसेंबर 2025 मधील एका घटनेचा उल्लेख करत विद्या प्रतिष्ठानच्या एआय इमारतीच्या बांधकामाजवळ मध्यरात्री अघोरी पूजा मांडण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंदर्भातील काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी अजित पवार या ठिकाणी पाहणीसाठी येणार होते, असा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच, 28 डिसेंबर 2025 रोजीही त्याच परिसरात अशाच प्रकारची अघोरी पूजा झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “भयावह” असा उल्लेख करत या घटनांची गंभीरता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. याशिवाय, काटेवाडीतील खताळपट्टा परिसरात अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, विमान अपघातापूर्वी त्या ठिकाणी बोकड उलटं टांगून त्याखाली अघोरी पूजा करण्यात आली होती. काही महिन्यांनंतर हे दृश्य उघडकीस आल्याचेही सांगितले जात आहे. या दाव्यांमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय वर्तुळात नवा वाद दरम्यान, अमोल मिटकरी यांनी या सर्व प्रकारांमागील सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली आहे. अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या अजित पवार यांच्याच परिसरात असे प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद करत, यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास व्हावा, असेही त्यांनी सुचवले आहे. या सर्व घडामोडींमुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून, पुढे या प्रकरणात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
