मनपातर्फे उद्यापासून शहरातील सर्व प्रभागांत साफसफाई अभियान:स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांची माहिती
![]()
मनपाच्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रभागांत शुक्रवार, २४ एप्रिलपासून साफसफाई अभियान राबवण्यात येणार आहे. याअभियानात भाजपच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक आणि नागरिकांचा लोकसहभाग राहणार आहे. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन टप्प्यात हे साफसफाई अभियान राबवले जाईल. त्याचे नियोजन मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे २३ एप्रिलला जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, नगरसेवक जयंत मसने, शहर सुधार समितीचे गटनेते पवन महल्ले आदी उपस्थित होते. सभापती अग्रवाल यांनी सांगितले की, ‘मनपाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा, कचरा संकलन घंटागाडी, गटारी, नाले साफसफाई, पथदीवे, रस्ते, अग्नीशमन सेवा आदी दैनंदिन अत्यावश्यक २६ सेवा लवकरच ऑनलाइन पुरवण्यात येणार आहे, त्याच्या निविदेस स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील कचरा संकलनापोटी घंटागाडी चालकांकडून यापुढे ५० रुपये महिना आकारणी बंद करुन ती वर्षभराची एकत्रित रक्कम ६०० रुपये मालमत्ता करात आकारणी करण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले. २०१६ नंतर जन्मलेल्यांचा जन्मदाखला त्याच दिवशी तत्काळ देणे सुरू करण्यात येईल. ६०० कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. १३ नवीन जलकुंभांचे शहराच्या विविध भागात करणार बांधकाम करणार. ११ मनपा मराठी शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला असून लवकरच दुुरुस्ती करण्यात येईल. १० किलोमीटर मोर्णा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवण्यास सुरवात झाली आहे. ४ महिन्यात शहरात पीएम ई- सिटी बस सेवा सुरु करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. ३ हजार फुटांपर्यंतच्या गुंठेवारी भूखंडांना नियमानुकूल करण्याची वर्षभराची मुदत देण्यात आली आहे. जिगाव प्रकल्पावरून शहरासाठी २८ एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर झाले असून, या प्रकल्पावरून निमकर्दा प्रकल्पावरुन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दीड-दोन वर्षांत जिगाव प्रकल्प आणि महान येथील काटेपूर्णा प्रकल्प मिळून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विचार करता शहरातील वाढीव हद्द भागासह संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही सभापती विजय अग्रवाल यांनी यावेळी दिली. कर नियमानुसार ६०० रुपये कर आकारणी ही नियमानुसार आहे, नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टिने हातभार लावण्यासाठी या निर्णयास सहकार्य करावे. विरोधकांकडे कोणताच मुद्दा न उरल्याने ते या निर्णयास विरोध करत आहेत. आमचे काही चूकत असेल तर त्यांनी आवश्यक सांगावे पण केवळ विरोधासाठी विरोध करु नये. आम्ही कोणतीही कर वाढ जनतेवर लादणार नाही.
