खासदार वानखडेंनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज भरला:'मी स्पर्धेत नाही', 28 एप्रिलनंतर नवे नेतृत्व जाहीर होणार
![]()
अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी देशभरात ‘सृजन संघटन अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नवे पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ग्रामीण आणि शहर असे दोन्ही जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. यासाठी मुलाखती आणि कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी केंद्रीय निरीक्षक आफताब अहमद (हरियाणा आमदार) आणि राज्याचे निरीक्षक भाई जगताप (आमदार) हे चार दिवस अमरावतीत होते. या काळात निरीक्षकांनी विश्रामगृहावर अनेक पदाधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधला. काही जणांनी सामूहिकरित्याही आपली भूमिका मांडली. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष कोण असावा, याबाबत त्यांनी मते जाणून घेतली. ही मते बंद लिफाफ्यात एका अहवालाच्या स्वरूपात २३ किंवा २४ एप्रिल रोजी पक्षश्रेष्ठींकडे सादर केली जातील. त्यानंतर साधारणतः २८ एप्रिलच्या आसपास नव्या नेतृत्वाची निवड घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठीच्या दावेदारांबद्दलचा अहवाल पाठवताना सर्वसाधारण (खुला प्रवर्ग), इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (व्हीजे-एनटी), अल्पसंख्याक आणि महिला अशा प्रत्येक संवर्गातून संभाव्य नावे समाविष्ट करावीत, असा पक्षादेश आहे. त्यामुळे निरीक्षकांकडून पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्या जाणाऱ्या अहवालात या सातही संवर्गातील नावांचा समावेश असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यमान अध्यक्षांना विरोध असल्याने या पदासाठी १४ जणांनी अर्ज भरले आहेत. या संदर्भात खासदार बळवंतराव वानखडे यांनी म्हटले आहे की, “मी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे, परंतु मी स्पर्धेत नाही.” निरीक्षकांसमोर झालेल्या चर्चेदरम्यान बहुतेक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी बबलू देशमुख यांनाच पुन्हा संधी देण्याची मते मांडली आहेत, असेही ते म्हणाले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे वानखडे यांनी स्पष्ट केले.
