अमरावती विधान परिषद निवडणूक:काँग्रेसला मोठा धक्का, 96 नगरसेवकांनी 'व्हीप'चे उल्लंघन करत केले मतदान




अमरावती प्रतिनिधी | अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तटस्थ राहण्याचा ‘व्हीप’ जारी केला असतानाही, अमरावती आणि तिवसा वगळता इतर ठिकाणच्या ९६ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला. यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी नगरसेवकांना निवडणुकीत तटस्थ राहण्याचा पक्षादेश (व्हीप) दिला होता. मात्र, १२० काँग्रेस नगरसेवकांपैकी तब्बल ९६ जणांनी या व्हीपचे सर्रास उल्लंघन करत मतदान केले. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, त्यांचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांची बिघडलेली प्रकृती आणि स्थानिक नेतृत्वाने वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ते निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे १८ जून रोजीच्या निवडणुकीत मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती. नगरसेवकांनी व्हीप झुगारण्यामागे निवडणुकीतील काही उमेदवारांकडून ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याचे कारण पुढे येत आहे. मतदान न केल्यास भविष्यात अडचणी येऊ शकतात, या भीतीने अनेक नगरसेवकांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, एकूण ४५१ मतदारांपैकी ४२७ मतदारांनी मतदान केले. अमरावतीत ११, तिवस्यात १२ आणि दर्यापुरातील एक अशा केवळ २४ जणांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला नाही. काँग्रेसच्या दाव्यानुसार, हे २४ जण काँग्रेसचेच आहेत. जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहता, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३, युवा स्वाभिमानचे २६, प्रहारचे २१, शिंदेसेनेचे १८ आणि बसपचे ३ असे एकूण २५१ सदस्य आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे १२०, उद्धवसेनेचे २१ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ११ असे एकूण १५२ सदस्य आहेत. याशिवाय, एमआयएमचे १६, वंचितचे ७, सपाचे २ आणि २५ अपक्ष असे ५० सदस्य दोन्ही प्रवाहांपासून दूर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *