अमरावतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासने, आरोग्य तपासणी, जीवनशैली मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कायदेविषयक मार्गदर्शन असे उपक्रम घेण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि श्री सत्य साई सेवा सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक मंडळाने हे कार्यक्रम आयोजित केले. ज्येष्ठ नागरिक महासंघ समन्वय समितीने सहकार्य केले. उपक्रमांमध्ये बैठे खेळ आणि देवदर्शन सहलीचाही समावेश होता. कर्तव्य मंगल कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठे खेळ घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रादेशिक अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांनी ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, प्राचार्य दादाराव दाभाडे, अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष दामोदर पवार, श्री सत्य साई सेवा मंडळाच्या समन्वयिका गुंजन वाकळे आणि वैशाली पाटील उपस्थित होते. मोहिते म्हणाले की, आई-वडिलांचा निर्वाह, कल्याण आणि संरक्षणासाठी केंद्र सरकारने हा कायदा केला. मुलांनी आई-वडिलांचा सांभाळ केला नाही, तर ज्येष्ठ नागरिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात. ९० दिवसांत निकाल मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकाला घरातून बाहेर काढल्यास त्याला पुन्हा घर मिळायला हवे. त्याच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मोहिते म्हणाले. प्रत्यक्षात प्रत्येक तालुक्यात वृद्धाश्रम, हेल्पलाइन आणि समुपदेशन केंद्र नसल्याचे सांगत, कायद्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हायला हवी, असे त्यांनी नमूद केले. गुंजन वाकळे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठे खेळ घेतले. देविदास गेडाम, प्रभाकरराव उमक, बी. के. कोंडे, अशोकराव हांडे, नरेंद्र तायडे, अनिल वानखडे आणि दीपक जुनघरे यांनी गीते सादर केली. कवयित्री छायाताई पाथरे यांनी नाटिका सादर केली, तर नीताताई खोंडे यांनी गीत म्हटले. पुरुषोत्तम गावंडे यांनी ज्येष्ठांची आचारसंहिता कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले. संगीत खुर्ची स्पर्धेत दामोदर पवार यांनी प्रथम, तर नीताताई खोंडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation प्रगतिशील शेतकरी:दहा महिन्यांत दोन एकरांत 600 क्विंटल अद्रक; केजच्या चिंचोलीमाळीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग