![]()
मुंबईत शिवसेनेच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात विविध पक्ष व सामाजिक संघटनांतील हजारो कार्यकर्त्यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका मांडली. “जनतेच्या विश्वासाने शिवसेनेत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भागातील समस्या सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. तुमच्या हक्काच्या लढाईत हा एकनाथ शिंदे कायम खंबीरपणे पाठीशी उभा राहील,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारा, लोककल्याणकारी विकास मॉडेल आणि संघटनात्मक नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मुंबई, ठाणे, शहापूर, वसई-विरार, नालासोपारा आणि पालघर परिसरातील विविध पक्षांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाण्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कोरम मॉल शेजारील मातोश्री गंगुबाई शिंदे हॉल येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे तसेच विविध सामाजिक संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे दत्ता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गेली 15 वर्षे सरपंच म्हणून काम केलेल्या दत्ता पाटील यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. मानखुर्द येथील मनसेचे नेते प्रमोद पाटील यांनीही आज त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. याशिवाय मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस हरिश्चंद्र विश्वासराव, ग्राहक संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष संजय महाले, सामाजिक कार्यकर्त्या समायरा भारती आणि गौरी कटपरा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या मायनॉरिटी विभागाचे माजी अध्यक्ष मोहम्मद अख्तर मलिक यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्यांच्यासह शिवसेना (उबाठा) गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती भगवा घेतला. शहापूर तालुक्यातील 92 प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांच्या समवेत 75 हून अधिक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या पालघर जिल्हा महिला अध्यक्ष मेघा म्हात्रे, जिल्हा चिटणीस हरेश कोटकर, चंद्रकांत कदम, नालासोपारा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र शिरोडकर आणि युवक कार्याध्यक्ष यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यासोबतच पालघरमधील श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक रुपेश डोळे, लक्ष्मण फडवले आणि लहू खरपडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. विरार–नालासोपारा येथील विधानसभा उपसंघटक श्रद्धा जाधव यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख दिलीप जाधव, विभागप्रमुख विजय भोसले आणि उपविभाग प्रमुख गणपत गव्हाळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे मुंबई महानगर प्रदेश, ठाणे आणि पालघर विभागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिरडे, पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटात शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश:एकनाथ शिंदे म्हणाले- विश्वासाने आलात, आता तुमच्या लढाईत मी खंबीरपणे पाठीशी उभा
