नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नांदेड – गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. संतोष सूर्यवंशी यांचे आवाहन
नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, परंतु योग्य काळजी घेतल्यास आपण त्यापासून वाचू शकतो. आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी (काय करावे?)
पुरेसे पाणी प्या तहान लागलेली नसली तरीही वारंवार पाणी प्या. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. पेयांचा वापर,लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS) किंवा घरगुती उपलब्ध असलेल्या पेयांचा वापर करा, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील.
पोशाख बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. दुपारची वेळ टाळा -दुपारी १२ ते ३:३० या वेळेत कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.आहारावर नियंत्रण,पचायला हलके आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले हंगामी फळे (कलिंगड, संत्री, द्राक्षे) खावीत.
काय टाळावे?
दुपारच्या वेळी कष्टाची कामे उन्हात करणे टाळावे.
चहा, कॉफी किंवा मद्यपान करणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
बंद असलेल्या उभ्या वाहनात लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काय करावे?
जर एखाद्या व्यक्तीला खूप ताप येणे, चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटत असल्यास, त्याला त्वरित सावलीत बसवावे, ओल्या कपड्याने शरीर पुसावे आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.
Post Views: 54
