मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुरू केलेल्या दिवाळी जनजागृती मोहिमेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नकोत, आमच्या परंपरा संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत,” असा थेट हल्ला साटम यांनी चढवला. भाजपच्या या विरोधानंतर मुंबई महापालिकेने तातडीने नमते घेत दिया मिर्झाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केला. या कारवाईनंतर अभिनेत्री दिया मिर्झानेही “कोई पैसा नही लिया है, भलाई का जमाना ही नहीं रहा,” अशी संतप्त पोस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं प्रकरण काय? पालिकेची सेलिब्रिटी मोहीम वादात दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मुंबईतील वायू आणि ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने एक जनजागृती मोहीम हाती घेतली होती. नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, यासाठी महापालिकेने अनेक सिनेकलाकार आणि खेळाडूंचे छोटे जनजागृतीपर व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर पोस्ट केले होते. दिया मिर्झाचा व्हिडीओ या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही फटाके न फोडता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ केला होता. अमित साटम यांचा आक्षेप मात्र, हा व्हिडीओ समोर येताच भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून महापालिकेला टॅग करत थेट सवाल केला. “दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती आमच्यात खोलवर रुजलेल्या आहेत,” अशी भूमिका मांडत साटम यांनी संताप व्यक्त केला. पालिकेची माघार अन् दिया मिर्झाचे सडेतोड प्रत्युत्तर भाजपच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण न देता आपल्या अधिकृत अकाऊंटवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलीट केला. विशेष म्हणजे, याच मोहिमेअंतर्गत अभिनेत्री माधुरी दीक्षित, ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे, स्वप्निल जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, निशिगंधा वाड, हर्षदा खानविलकर, शिव ठाकरे आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचेही जनजागृतीपर व्हिडीओ पालिकेच्या पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. ते व्हिडीओ अजूनही पालिकेच्या सोशल मीडियावर कायम आहेत. दिया मिर्झाची संतप्त पोस्ट आपला व्हिडीओ हटवल्याचे समजताच दिया मिर्झाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली खंत व्यक्त केली. तिने लिहिले, “कोई पैसा नही लिया है, भलाई का जमाना ही नही रहा!” समाजहितासाठी विनामोबदला जनजागृती करूनही अशा प्रकारे राजकीय विरोध झाल्याने तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘महापालिकेवर अमित साटमांची दहशत!’; किशोरी पेडणेकरांचा घणाघात फक्त एकाच विशिष्ट अभिनेत्रीचा व्हिडीओ हटवण्यात आल्याने ठाकरे गटाच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि महापालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. “महापालिकेच्या कारभारावर अमित साटम यांची थेट दहशत निर्माण झाली आहे की काय? साटम यांच्या एका इशाऱ्यावरून महापालिका एवढी घाबरून का काम करत आहे? सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना बाहेरचे लोक महापालिका चालवत असल्यासारखे चित्र दिसतेय,” असा आरोप पेडणेकर यांनी केला. धर्माचे राजकारण केल्याचा आरोप “माधुरी दीक्षित, अजिंक्य रहाणे किंवा निशिगंधा वाड यांच्या व्हिडीओवर आक्षेप नाही, पण दिया मिर्झाच्या व्हिडीओवरच का आक्षेप घेतला गेला? दिया मिर्झा ही भारतीय नागरिक आहे. फक्त धर्म आणि व्यक्ती बघून जर आक्षेप घेतला जात असेल, तर भाजप अजूनही जाती-धर्माचे विष पसरवण्याचे काम करत आहे,” अशी घणाघाती टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या एका शासकीय मोहिमेला आता राजकीय आणि सांस्कृतिक रंग चढल्याने, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध भाजप असा नवा वाद पेटला आहे. इतर सेलिब्रिटींचे व्हिडिओ मात्र जैसे थे… ——————————————————- हेही वाचा… भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये: मोदींना पळून जाऊ देणार नाही, त्यांच्यावर खटले चालणार, त्यांच्यासह सर्व जेलमध्ये जाणार- संजय राऊत भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये. त्यांनी जर खरोखरच महाराष्ट्राची चिंता केली असती, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली नसती, असा जोरदार घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चलो दिल्ली रॅलीच्या यशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search