शिंदखेड्यातून नाशकात चोरटी वाळू वाहतूक:6 डंपरसह मुरुमाचे 2 ट्रॅक्टर जप्त, सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची छापेमारी
![]()
शिंदखेड्याच्या तापी नदीतून अवैधरित्या उपसा करून 30 ब्रास वाळूची नाशिकला चोरटी वाहतूक करणारे 6 डंपर व मुरूमचे दोन ट्रॅक्टर महसूलच्या तीन विशेष पथकांनी जप्त केले. गुरुवारी (दि.9) सकाळी मनमाड चौफुली व सवंदगाव परिसरात केलेल्या कारवाईत हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी सिध्दार्थ रामकुमार यांनी सिन्नर महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही छापेमारी केली. . मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची खात्री करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी रामकुमार हे तीन पथकांसह मालेगावात पोहोचले. त्यांनी मनमाड चौफुली परिसरात सापळा रचला. यावेळी तब्बल सहा डंपर वाळू वाहतूक करताना मिळून आले. पथकांनी पाठलाग केल्याने काही संशयितांनी वाहनांसह पळ काढला. मात्र, पथकाने पोलिसांच्या मदतीने सर्व डंपर पकडले. वाळू उत्खनन तसेच वाहतुकीचा कुठलाही परवाना डंपरचालकांकडे आढळून आला नाही. यादरम्यान दुसरी कारवाई सवंदगाव परिसरात करण्यात आली. बाजारभावाच्या पाच पटीने 21 लाखाचा दंड सहा डंपरमध्ये प्रत्येकी पाच यानुसार 30 ब्रास वाळू आढळली. बाजारभावाच्या पाच पटीने 21.44 लाग रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मुरूमचा स्वतंत्र दंड आकारला जाणार आहे. पथकाने किल्ला व मालेगाव तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाया केल्या आहेत. मंत्री बावनकुळेंच्या आदेशाने कारवाई महसूलमंत्री बावनकुळे यांनी मागील आठवड्यात बैठक घेतली होती. मालेगावात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असताना गौण खनिजची महसूल वसुली खूपच कमी असल्याचे लक्षात आल्याने कारवाईचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
