नांदेड / लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत धडक कारवाई केली. या मोहिमेत नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा प्रकार उघडकीस आणण्यात आला, तर लातूर जिल्ह्यात तिर्रट जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवायांत ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल १ कोटी ५ लाख २५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत डीआयजी शहाजी उमाप यांनी विशेष पथकाला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव निमजी शिवारात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पथकाने संबंधित वाळू धक्क्यावर छापा टाकला. यावेळी इंजिन बोटीच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळूचा उपसा केला जात असल्याचे, तसेच फायबर बोटीच्या माध्यमातून ही वाळू नदीकिनारी आणली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत एक हायवा, इंजिन बोट, फायबर बोट आणि चार तराफे असा एकूण ८६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातुरात जुगार अड्ड्यावर कारवाई

नांदेडमधील कारवाईनंतर विशेष पथकाने लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोर्चा वळविला. सावरी ते तगरखेडा मार्गावरील रमेश थेटे यांच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत ३५ हजार ९०० रुपयांची रोकड, ११ मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने आणि पाच दुचाकी असा एकूण १८ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध कारवाई करून औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८४/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांत कोट्यवधींचा मुद्देमाल ताब्यात

नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत पोलिसांनी एकूण ११ जणांविरुद्ध कारवाई केली. यात ३५ हजार ९०० रुपयांची रोकड, ११ मोबाईल, दोन चारचाकी वाहने, पाच दुचाकी, एक हायवा, इंजिन बोट, फायबर बोट आणि चार तराफे असा एकूण १ कोटी ५ लाख २५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या विशेष मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पथकाने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

अवैध धंद्यांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या

नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून खबर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ९१५०१००१०० हा या हेल्पलाइनचा संपर्क क्रमांक असून, नागरिकांनी अवैध धंद्यांबाबतची माहिती या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन डीआयजी शहाजी उमाप यांनी केले आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search