जायकवाडीतून गाळ काढणार, केटी वेअरचे बॅरेजमध्ये रूपांतर:सिंचन सुविधांसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा
![]()
जायकवाडी धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान चार आवर्तन दिले जातील. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली. पैठण येथील संतपीठात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार विजयसिंह पंडित, राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश बोरणारे, हिकमत उढाण, विलास भुमरे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, प्रकाश दादा सोळंके सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, निम्न दुधना प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप यांच्यासह बीड, परभणी, जालना जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. सिंचनासाठी जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून ज्याप्रमाणे चार आवर्तन दिले जातात, त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातूनही चार आवर्तन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली. याशिवाय, नांदूर मधमेश्वर कालव्यात उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन आणि निम्न दुधना प्रकल्पातून चार आवर्तन देण्यासही मंजुरी देण्यात आली. भविष्यातील सिंचन सुविधांच्या उपाययोजनांसाठी केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी राज्य स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. बीड, परभणी, जालना, संभाजीनगर येथील विविध मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या पाणी वाटपाच्या संदर्भात तसेच बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या मागण्यांना बैठकीत मान्यता देण्यात आली.
