सातारा क्राइम जगत:शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली 70 लाखांची फसवणूक; वस्तीगृह चालकास धमकी; प्रवेशावरून वाद
![]()
सातारा शहरातील देगाव फाटा परिसरातील आशीर्वाद कॉलनी येथे राहणाऱ्या नागरिकांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी दोन जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर(पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही)अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम जर्नी क्लब या ग्रुपचे अॅडमिन श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर यांनी सांगितल्या प्रमाणे फिर्यादी नितीन विष्णू निकम त्यांची बहीण इशा गजानन जाधव आणि पत्नी रूपाली नितीन निकम यांच्या बँक खात्यावरून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. जास्त नफा मिळेल असे सांगून त्यांनी फिर्यादीसह नातेवाईकांकडून ६ डिसेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान विविध बँक खात्यांद्वारे एकूण ७० लाख,८८ हजार रुपये घेतले. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता संबंधितांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर या दोघांविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत. साताऱ्यात वस्तीगृह चालकास धमकी; प्रवेशावरून वाद सातारा शहरात मुलींचे वस्तीगृह चालविणाऱ्या तक्रारदारास मुलीस ऍडमिशन का दिले अशी विचारणा करत शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जमीर गणी सय्यद (वय ५० रा.मल्हारपेठ,सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनिल उर्फ पपु बडेकर(रा.ढोरगल्ली,मल्हारपेठ,सातारा)याच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुलींचे वस्तीगृह चालवित असून दि.६ फेब्रुवारी २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान अनिल बडेकर यांनी वस्तीगृहात येऊन कावेरी कदम (रा. सदरबझार, सातारा) हिला प्रवेश कसा दिला, असा जाब विचारला. तसेच संबंधित मुलगी सध्या कोठे आहे याबाबतही त्यांनी विचारणा केली. यावेळी वाद वाढत गेल्याने बडेकर यांनी सय्यद यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी अनिल बडेकर यांच्या विरोधात कलम ३५१(२)३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहे. दारू पिण्यासाठी कन्ट्रक्शन व्यवसायिकाला मारहाण करत जबरी चोरी सातारा शहरातील बसाप्पापेठ परिसरात एका कन्ट्रक्शन व्यवसायिकाला दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी करून मारहाण करत जबरीने पैसे हिसकावून घेतल्याची घटना दि.७ रोजी घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ शरद चोरगे (वय ४२,रा.रविवार पेठ सातारा) यांनी विक्रम उमेश कांबळे (वय २४,रा. रविवार पेठ भाजी मंडई) आणि अनोळखी तीन व्यक्तींविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा एसटी स्टँड समोर असलेल्या शेतकरी भाजी मंडई येथील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान विक्रम कांबळे याने फिर्यादी चोरगे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने कांबळे याने चिडून फिर्यादीला दोन कानाखाली मारून त्याच्या शर्टच्या वरच्या खिशातील ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दुपारी सुमारे १२.३० ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी बसाप्पापेठ, सातारा येथे आला असता,संशयित आरोपीने त्याच्या सोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांसह फिर्यादीला पुन्हा हाताने मारहाण केली. यावेळी आरोपीकडे सुरीसारखे शस्त्र असल्याचीही माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,या घटनेची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बागवान करत आहेत.
