नांदेड / छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) –  नांदेड येथील प्रसिद्ध वक्फ संस्था दर्गाह शाह रहमान आणि मस्जिद, वजीराबाद, खडकपुरा येथील गैरव्यवहार आणि दुर्लक्षाच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने मोठी कारवाई केली आहे. वक्फ मंडळाने संस्थेचे तात्पुरते मुतवल्ली रहेमतुल्लाह शाह याकुब शाह यांची नियुक्ती रद्द करून त्यांना पदावरून बरखास्त केले आहे. वक्फ कायद्याच्या कलम ६४ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैय्याझ खान यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला. या आदेशानुसार, दर्गाह व मशिदीचे संपूर्ण व्यवस्थापन आता जिल्हा वक्फ अधिकारी, नांदेड यांच्यामार्फत थेट महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नियंत्रणाखाली घेण्यात आले आहे.

गैरव्यवहार आणि बेकायदेशीर नियुक्तीचा अहवाल

जिल्हा वक्फ अधिकारी, नांदेड यांनी ५ सप्टेंबर २०२३ रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले होते की, तात्पुरते मुतवल्ली रहेमतुल्लाह शाह हे हैदराबाद येथे वास्तव्यास असून ते वक्फ संस्थेत नियमित येत नव्हते व प्रत्यक्ष व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करत होते. तसेच, कोणताही वैधानिक अधिकार नसताना त्यांनी २ जानेवारी २०१७ रोजी शेख शमीम शेख इसाक यांची गैरकायदेशीररीत्या नायब मुतवल्ली म्हणून नियुक्ती केली होती.

भू-माफियांशी संगनमत आणि तक्रारींचा आधार

स्थानिक नागरिक व मशिदीच्या हक्कासाठी लढा देणारे मोहम्मद अब्दुल हफीज यांनी २७ जुलै २०२३ रोजी वक्फ मंडळाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, तात्पुरते मुतवल्ली व नायब मुतवल्ली यांनी वक्फ कायद्याचे उल्लंघन करून इनामी जमिनीची बेकायदेशीर विक्री, भाडेपट्टा करार आणि जमीन हस्तांतरित करण्यासाठी भू-माफिया व गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींना मदत केली. तसेच, जमिनीचे रक्षण करणाऱ्या मस्जिद समितीच्या सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. याशिवाय खासदार डॉ. फौजिया खान व इतर लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाईबाबत पत्रव्यवहार केला होता.

इतिहास आणि ११ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष

हजरत अब्दुल्ला शाह गाझी उर्फ दुल्हा शाह रहमान शहीद यांच्या दर्गाह व मशिदीसाठी हैदराबादच्या निजामाने सुमारे ३६ बिघा म्हणजे अंदाजे ३५ एकर जमीन सेवा शर्तीवर इनामी दिली होती. १९५० च्या दशकात स्थानिक रहिवाशांनी मशिदीचा विस्तार केला आणि ती जामिया मशीद म्हणून प्रसिद्ध झाली. १९७७ मध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार दफनभूमीसाठी म्हणजेच कब्रस्तानसाठी ३ एकर जमीन नगरपालिकेने वक्फ बोर्डाकडून खरेदी केली होती. काळाच्या ओघात जमिनीचे भाव वाढल्याने भू-माफियांनी या मौल्यवान वक्फ जमिनीवर डोळा ठेवून गैरव्यवहार सुरू केले होते. स्थानिक दर्गाह व मस्जिद समितीने २०१५ पासून वक्फ बोर्डाकडे ठोस पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या. अखेर रहिवाशांच्या सततच्या ११ वर्षांच्या संघर्षाला यश आले असून ३५ एकर इनामी जमीन सुरक्षित झाली आहे.

नागरिकांकडून आभार व भविष्यातील संकल्प

तात्पुरता मुतवल्ली बरखास्त करून जमीन वक्फ बोर्डाच्या थेट ताब्यात घेतल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी फैय्याझ खान,भारतीय जनता पार्टीचे नेते चैतन्य बापू देशमुख व सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. दर्गाह दुल्हा शाह रहमान शहीद यांच्या १४८ व्या वार्षिक उर्स मुबारक प्रसंगी परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी असा निश्चय केला आहे की, ही संरक्षित वक्फ जमीन आता तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि विधवा महिलांच्या आर्थिक मदतीसाठीच वापरली जाईल.

 


Post Views: 13










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search