खुर्चीवर बसलेला एक दिवस उठणारच:भाजपच्या स्थापनादिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नेत्यांचे टोचले कान
![]()
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अध्यात्मिक सल्ला दिला. ‘खुर्चीवर बसलेला एक दिवस उठणारच आहे. त्याला उठावेच लागणार आहे. नाही उठला तर देव उठवून घेऊन जाईल. याला कोणी अपवाद नाही,’ असे गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, ‘हे तात्पुरते काम आहे. खुर्ची मिळाल्यावर शांततेने राहा, अंगात येऊ देऊ नका. खुर्ची कधीही जाऊ शकते. पोलीसही तुम्हाला सोडून जातात, ते कधीही सोडून जाऊ शकतात.’ गडकरींनी पदाची तात्पुरतीता आणि नम्रतेचे महत्त्व अधोरेखित केले. नेतृत्वाच्या बदलावर बोलताना गडकरी म्हणाले की, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पिढ्या बदलत राहतात आणि नेतृत्वही बदलले पाहिजे. ‘याचा अर्थ नेत्याच्या पोटातून नेता जन्माला आला पाहिजे असे नाही, तर कार्यकर्त्यांमधून नेतृत्व विकसित झाले पाहिजे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गडकरींनी त्यांच्या इराण भेटीचा एक किस्सा सांगितला. ते जहाजबांधणी मंत्री असताना इराणमध्ये चाबहार बंदर बांधण्याचे काम त्यांना मिळाले होते. त्यावेळी इराण-अमेरिकेचे युद्ध सुरू असताना ते सात-आठ वेळा इराणला गेले होते. एकदा संरक्षण विभागाच्या विशेष विमानाने जात असताना पाकिस्तानने त्यांचे विमान मध्येच थांबवून पुढे जाण्यास मनाई केली होती. त्यानंतर तेथून परत येऊन गुजरातमार्गे चाबहारला गेले होते, असे त्यांनी सांगितले. गडकरींनी सांगितले की, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांसह सिंधू नदीच्या पलीकडे विकसित झालेल्या संस्कृतीशी भारताचे नाते आहे. त्यांनी अयातुल्ला खोमेनी यांची त्यांच्या घरी भेट घेतल्याचे सांगितले. त्यावेळी खोमेनींनी त्यांना पर्शियन भाषेच्या उगमाबद्दल विचारले होते. खोमेनींनी स्वतः सांगितले होते की, संस्कृत ही त्यांची मूळ भाषा असून पर्शियन भाषेचा उगम संस्कृतमधून झाला आहे. इराणमधील तेहरान विद्यापीठात संस्कृत विभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले. खोमेनींनी आपले मूळ लखनऊजवळील एका गावात असल्याचेही गडकरींना सांगितले होते. आपला वारसा, संस्कृती आणि इतिहास एकच असल्याचे सांगत गडकरींनी ‘काश्मीर हो या गोहाटी, अपना देश, अपनी माटी’ हा नारा दिला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांच्याशी संबंधित एक आठवण त्यांनी सांगितली. गडकरी राजकारणात नवीन असताना अंतुले यांनी त्यांना बोलावून ‘तुम्हाला माहिती आहे काय मी कोण आहे?’ असे विचारले होते. गडकरींना माहिती नसल्याचे सांगितल्यावर अंतुले यांनी ‘मी कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि माझे आडनाव करंदीकर आहे,’ असे सांगितल्याचे गडकरींनी नमूद केले.
