खेड-शिवापूरमध्ये सराफी दुकानावर सशस्त्र दरोड्याचा थरार!:शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; बुरखाधारी दरोडेखोरांचा डाव फसला

महाराष्ट्र




पुण्याच्या भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरातील बांडेवाडी येथे एका सोन्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुरखा घालून आलेल्या चार अज्ञातांनी हातात कोयते आणि बंदुकीसारखी शस्त्रे घेऊन दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, शेजारील एका सतर्क दुकानदाराने दाखवलेल्या धाडसामुळे हा दरोडा फसला असून या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ही घटना शनिवारी (17 ऑक्टोबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बांडेवाडीतील ‘श्रीनाथ ज्वेलर्स’मध्ये घडली. चार दरोडेखोर अंगावर बुरखा घालून दुकानात शिरले होते. त्यांनी या बुरख्याच्या आत कोयते आणि बंदुका लपवून आणल्या होत्या. दुकानात प्रवेश करताच या गुंडांनी थेट शस्त्रांचा धाक दाखवत दुकानदाराला लुटण्याची तयारी सुरू केली होती. सतर्क शेजाऱ्यामुळे टळला अनर्थ याच वेळी शेजारील दुकानातील एका व्यक्तीला बुरखाधारी तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. काहीतरी अनुचित प्रकार घडत असल्याचा संशय आल्याने त्याने ‘श्रीनाथ ज्वेलर्स’मध्ये डोकावून पाहिले. आत दरोडा पडत असल्याचे पाहताच या दुकानदाराने प्रसंगावधान राखून मोठा आरडाओरडा सुरू केला. लोकांचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून चोरांची पाचावर धारण बसली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिथून धूम ठोकली. पोलिसांचा तपास सुरू या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पसार झालेल्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. या थरारक घटनेमुळे व बुरख्याचा आडोसा घेऊन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या या टोळीमुळे खेड-शिवापूर परिसरात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry