हिंगोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:2.54 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल




कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारातील आबादानी जवळील कालवा रोड भागात कळमनुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्यावर छापा टाकून ४ मोबाईल, पाच दुचाकीसह २.५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर शनिवारी ता. १७ कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकण्याची मोहिम हाती घेण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके कार्यरत आहेत. दरम्यान, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत अवैध व्यवसाय चालु दिले जाणार नाही असा इशारा उपाधिक्षक मयूर रसाळ यांनी दिला होता. त्यानंतरही काही ठिकाणी चोरूनलपुन अवैध व्यवसाय सुरु होते. वाकोडी शिवारात कालवा मार्गावर काही जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपाधिक्षक मयूर रसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार गजानन होळकर यांच्यासह पोलिस पथकाने शुक्रवारी ता. १६ रात्री जुगार अड्डयावर छापा टाकला. यामध्ये पाच जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावेळी एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ मोबाईल, ५ दुचाकी, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपाधिक्षक मयूर रसाळ यांच्या तक्रारीवरून सुनील वानखेडे, बालाजी असोले, विठ्ठल काकडे, राजेश शिंदे, आकाश बोके यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक गव्हाणे पुढील तपास करीत आहेत. ————— हेही वाचा.. हिंगोली हादरली: पत्नीचा खून करून पतीनेही संपवले जीवन; सासू गंभीर जखमी, कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारातील घटना
कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पत्नीच्या माहेरी जाऊन मारहाण करून खून केला तसेच सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर पतीनेही गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गुरुवारी ता. 15 कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *