अमरावती सुपर स्पेशालिटीत दुर्मिळ अन्ननलिका कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया:डॉ. अतुल यादगिरे यांच्या नेतृत्वाखाली 40 वर्षीय महिलेवर उपचार




अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे अन्ननलिकेच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ४० वर्षीय महिलेवर यशस्वी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या महिलेला कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल यादगिरे आणि त्यांच्या चमूने जीवनदान दिले. रुग्णाला अन्न गिळताना आणि पाणी पितानाही तीव्र त्रास होत होता. अन्ननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक तपासण्या आणि आवश्यक निदानानंतर तिला अन्ननलिकेचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले. यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, ज्यात छाती, पोट आणि गळा या तीन ठिकाणी प्रक्रिया करावी लागते. अतिरक्तस्राव, महत्त्वाच्या अवयवांना इजा, संसर्ग आणि जीवाला धोका अशा अनेक गुंतागुंतींचा संभव असतो. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची संपूर्ण अन्ननलिका काढून टाकून जठरापासून नवीन अन्ननलिका तयार करून तिची यशस्वी जोडणी करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असून ती आता अन्न गिळू शकत आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण उपचार करण्यात आले. या यशस्वी शस्त्रक्रियेत कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल यादगिरे यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. राखी वानखडे, डॉ. माधुरी गाडेकर, डॉ. शुभांगी नरवाडे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, डॉ. ऐश्वर्या रायबोले, डॉ. नित्यानंद अरबट, डॉ. वर्धिनी कळंबे, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, अधिसेविका चंदा खोडके, मालती प्रधान, इन्चार्ज सिस्टर संगीता आष्टेकर, संध्या होले, ग्लोरी वानखडे, प्रियंका गायकवाड, वैष्णवी मरकाडे, सुमित्रा कोरे, वैभवी कोथळकर, ईश्वरी येवले, कल्याणी नगराळे, लक्ष्मण वाळुकर, शारदा राठोड, अथर्व लोंढे, श्याम चव्हाण आणि औषध विभागाचे योगेश वाडेकर आदींनी मोलाचे योगदान दिले. सुरुवातीला रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय या मोठ्या शस्त्रक्रियेबाबत साशंक होते, परंतु डॉक्टरांनी योग्य समुपदेशन केले. ही शस्त्रक्रिया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्करोग उपचार विभागाची उच्च दर्जाची वैद्यकीय क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *