पैठणमध्ये साकार होणार भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर:नाथवंशज योगिराज महाराज गोसावी यांचा संकल्प, 6एकर जागेवर होणार मंदिराची उभारणी‎



संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधीभूमी असलेल्या ऐतिहासिक पैठण नगरीत संतविचारांचा वारसा चिरंतन जतन करण्याच्या उद्देशाने भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नाथवंशज योगिराज महाराज गोसावी पैठण

.

संत एकनाथ महाराजांच्या १४ व्या वंशजांच्या या संकल्पनेला भाविकांच्या सहभागातून प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा मानस असून शांतिब्रह्म स्पिरिच्यूअल फाउंडेशनच्या माध्यमातून हे पवित्र कार्य उभे राहणार आहे. या मंदिर उभारणीच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांचे विचार, त्यांनी रचलेले ग्रंथवाङ्मय आणि त्यांनी दिलेला मानवतेचा अमर संदेश भावी पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा मुख्य प्रयत्न केला जाणार आहे. या भव्य-दिव्य प्रकल्पासाठी किमान सहा एकर जागेवर मंदिर संकुल उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रस्तावित मंदिराची रचना पारंपरिक भारतीय मंदिर स्थापत्यशैलीत असणार असून, त्याच्या संपूर्ण परिसरात भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येईल. तसेच मंदिराच्या तटबंदीवर व परिसरात संतविचारांचे दर्शन घडविणारी विविध भित्तिशिल्पे साकारली जाणार आहेत. दरम्यान, पैठण येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे एकनाथी भागवत मंदिर साकारल्यास विविध धार्मिक कार्यक्रमांना चालना मिळणार आहे.

संतवाङ्मयाचे ज्ञानकेंद्र योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितले की, हे केवळ दगड-विटांचे मंदिर नसेल; तर संतवाङ्मयाचे ज्ञानकेंद्र, वारकरी संस्कृतीचे विद्यापीठ, गोसेवेचे धाम आणि भावी पिढ्यांच्या संस्कारांचे तीर्थक्षेत्र ठरेल. अध्यात्माबरोबरच ज्ञान, संस्कार, गोसेवा आणि वारकरी परंपरेचे जतन या घटकांना प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमामुळे पैठणच्या आध्यात्मिक वैभवात मोलाची भर पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *