
शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतून कंपन्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत १० हजार कोटी रुपये कमावले, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. यामुळे कंपन्यांच्या कमाईचा आकडा पहिल्यांदाच विधिमंडळाच्या रेकाॅर्डवर आला आहे.
.
पीक विमा योजनेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप सत्ताधारी, विरोधी आमदारांनी वारंवार केला. त्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी किती रुपये मिळवले, याचा आकडा शेतकरी वर्गात उत्सुकतेचा विषय होता. दरम्यान, यासंदर्भात कोकाटे असेही म्हणाले की, राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे. जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील, सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कोकाटे यांनी सांगितले की, २०१६ पासून देशात ही योजना राबवली जात आहे. परंतु, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड या राज्यांनी ही योजना राबवली नाही. बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व जम्मू-काश्मीरने योजना बंद केली. झारखंडने पुन्हा एक रुपयात योजना सुरू केली, पण प्रत्यक्षात भरपाई मिळाली नाही.
खरिपासाठी २, रब्बीसाठी १.५ टक्के आकारणी
नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा कवच देण्यात येणार आहे. खरिपासाठी २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के आणि नव्या पिकांसाठी ५ टक्के इतकी आकारणी करण्यात येईल. उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून भरली जाणार आहे. या योजनेत विमा कंपनी बदलण्याऐवजी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि पारदर्शक ट्रिगर प्रणाली ठेवण्यात आली आहे. सध्याचे ट्रिगर बदलणे शक्य नसल्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
५० टक्के ट्रिगर पीक कापणीवर आधारित
महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत आतापर्यंत ५० टक्के ट्रिगर हे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित होते. उर्वरित ट्रिगर्स एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यंत्रणांद्वारे नुकसान भरपाईसाठी वापरले जात होते. मात्र, अनेक विमा कंपन्या आणि काही सीएससी सेंटरमार्फत गैरप्रकार झाल्याचे आढळले. सरकार एवढा पैसा विमा कंपन्यांना देत असेल, तर तोच पैसा थेट शेतकऱ्यांच्या शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी का वापरू नये, असा सवालही सदस्यांनी केला.
कोकणात फणस संशोधन केंद्र सुरू करण्यास कोकाटेंचा नकार
मुंबई | राज्यात विविध ७७ संशोधन केंद्रे सुरू आहेत. फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचे अभिप्राय वित्त व नियोजन विभागाने दिले आहेत. यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार दापोली कृषी विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितले.
दरम्यान, स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले. सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे फणस संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेत प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला होता. ॲड. कोकाटे म्हणाले, फणसाच्या मूल्यवर्धनासाठी तसेच फणस उद्योगाला चालना देण्यासाठी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.