
सोलापूर येथे मराठा संघटनांच्या बैठकीत तुफान राडा झाला असून, दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अलीकडेच अक्कलकोट येथे शाईफेक आणि काळे फासल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठी समाजाची बैठक
.
सोलापुरात प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक करत काळे फासण्यात आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या विविध घटकांनी बैठक आयोजित केली होती. प्रवीण गायकवाड यांनी सत्काराच्यावेळी हल्ला झाल्यामुळे अक्कलकोटचे जनमेयजय राजे या आयोजकांवरच संशय व्यक्त केला होता. त्यांचे पूत्र अमोल राजे यांच्याविरोधात या बैठकीत एकाने वक्तव्य केले, त्यामुळे राजे समर्थकांनी त्यांना मारहाण केली. या हाणामारीच्या घटनेनंतर बैठकस्थळी एकच खळबळ उडाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.
जन्मजयराजे भोसले काय म्हणाले?
सोलापुरात सकल मराठा समाजाची सुरळीत बैठक सुरु होती. मात्र पंढरपूरच्या वकिलाने माझ्याबद्दल चुकीचे बोलल्यामुळे गोंधळ उडाला. यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. याउलट माझा मुलगा अमोलराजेने दीपक काटे याला सज्जड दम दिलाय. सभेत बोलणारा युवक चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत होता. माझा मुलगा अमोल याने दीपक काटेला घडलेले कृत्य चुकीचे झाल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे, असे जन्मजयराजे भोसले म्हणाले.
सोलापुरातील वातावरण तापले
दरम्यान, शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना काळे फासल्याचा घटनेने सोलापुरातील राजकीय वातवरण तापले आहे. प्रवीण गायकवाड यांना काळे फासल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाचे पडसाद मराठा समाजातही उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत राडा झाल्याची घटना घडली आहे.