सगरोळी-नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारी हायवा जप्त; येळी येथे २० लाखांची लोखंडी बोट जिलेटीनच्या साह्याने नष्ट


बिलोली/उस्माननगर : सगरोळी ते नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा गाडीवर बिलोली पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत उस्माननगर पोलिसांनी मौजे येळी (ता. लोहा) येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारी २० लाख रुपये किमतीची लोखंडी बोट जिलेटिनच्या साह्याने नष्ट केली.

बिलोली येथील पोलीस कॉन्स्टेबल निरंजन अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर सगरोळी ते नरसी रस्त्यावर अतिथी बाळ परिसरात पोलिसांनी तपासणी दरम्यान एमएच ५५ सी ९०००  क्रमांकाची हायवा गाडी अडवली. गाडीत वाळू भरलेली आढळून आली. वाळू वाहतुकीबाबत चालकाने समाधानकारक कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सुमारे ४० लाख रुपये किमतीची हायवा गाडी व ३५ हजार रुपये किमतीची सात ब्रास वाळू असा एकूण ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी रवींद्र फुलसिंग पवार (वय ३२, रा. रामानंद तांडा, महा डोणगाव, ता. औराद, जि. बिदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार तिडके, पोलीस कर्मचारी मुद्देंमवार, अंभोरे व धूमपटवाड यांनी केली.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी माधव भगवानराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलीस उप अधीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस अंमलदार चव्हाण, माधव पवार, तुकाराम जुने, प्रकाश पेदेवाड, प्रदीप राठोड तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौजे येळी (ता. लोहा) येथे गोदावरी नदीपात्रात छापा टाकला.

यावेळी लोखंडी बोटीच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारा संभाजी प्रभाकर सोमवारे  हा घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी कायदेशीर पंचनामा करून सुमारे २० लाख रुपये किमतीची लोखंडी बोट जिलेटिनच्या साह्याने नष्ट केली. या दोन्ही कारवायांमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Post Views: 6






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *