नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ निवड समितीने २०२४मध्ये प्रकाशित उत्तम, दर्जेदार ग्रंथांची यादी जाहीर केली असून यात नांदेड येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक मधव चुकेवाड यांच्या दोन पुस्तकांची निवड झाली आहे.
बालकवी माधव चुकेवाड यांची आतापर्यंत १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालकांवर सुसंस्कार व्हावेत, मनोरंजनही व्हावे आणि उद्याची पिढी संस्कारयुक्त घडावी हा ध्यास घेऊन माधव चुकेवाड हे सातत्याने लेखन करीत असतात. त्यांची नांदेडच्या इसाप प्रकाशनाने ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ हा सप्तरंगी बालकवितासंग्रह व ‘श्री संतकवी दासगणु महाराज’ हे बालकांसाठी चरित्र अशी दोन पुस्तके प्रकाशित केली होती. या दोन्ही पुस्तकांची निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय निवड समितीने केली आहे.
आय. एस. बी. एन. नंबर असलेली तसेच उत्तम साहित्य, सकारात्मक विचार करायला शिकविणारी आणि व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करणारी पुस्तके वाचकांना मिळावीत यासाठी या पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहे.
या निवडीबद्दल इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देवीदास फुलारी, शंकर वाडेवाले, आनंद पुपलवाड, पंडित पाटील, विजयकुमार चित्तरवाड, अशोक कुबडे, गिरीश कहाळेकर यांनी माधव चुकेवाड यांचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 71
