८ जणांवर कारवाई; रोख रक्कम, मोबाईल व पाच मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ४ ऑक्टोबर रोजी उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून ८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, तब्बल ५ लाख ८९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उस्माननगर परिसरातील सातबारा हॉटेलच्या पाठीमागे टिन शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने छापा टाकत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख १९ हजार ९२० रुपये रोख, सात मोबाईल आणि पाच मोटारसायकली, असा एकूण ५,८९,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी ८ जणांविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डुबरे यांनी केली. विशेष पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिसांना द्या
अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी थेट पोलिसांपर्यंत पोहोचवावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ९१५०१००१०० या मोबाईल क्रमांकावर परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी या हेल्पलाईनचा उपयोग केला जाणार आहे.

Post Views: 69
