साताऱ्यात कौटुंबिक वादाचा भीषण शेवट!:वडिलांच्या बॅटच्या प्रहारात 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; पुरावे पुसण्याचाही प्रयत्न




घरातील किरकोळ वादाचे रूपांतर टोकाच्या संघर्षात होऊन एका 17 वर्षीय मुलीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना सातारा शहरातील गोडोली परिसरात घडली. शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून सुरू झालेला वाद मोबाईलच्या वापरावरून वाढला. त्यानंतर झालेल्या झटापटीत वडिलांनी मुलीच्या डोक्यात लाकडी बॅटने प्रहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गंभीर दुखापत झाल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेनंतर घरातील रक्ताचे डाग तसेच घटनास्थळावरील अन्य पुरावे पुसण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. पुरुषोत्तम संपत कदम असे संबंधित वडिलांचे नाव असून ते मूळचे चंचळी, तालुका कोरेगाव येथील असल्याची माहिती आहे. ते शिक्षक असून त्यांची पत्नी शीला कदम यादेखील शिक्षिका आहेत. संबंधित कुटुंब गोडोली परिसरात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या वर्तनावरून घरात वारंवार वाद होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. टीव्ही बंद करण्यावरून वाद शनिवारी रात्री घरात टीव्ही बंद करण्यावरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर मोबाईलच्या वापराच्या मुद्द्यावरून वाद आणखी वाढला. मुलगी आक्रमक झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान तिच्या हातात असलेली लाकडी बॅट वडिलांनी हिसकावून घेतल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर याच बॅटने मुलीच्या डोक्यात प्रहार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बॅटचा प्रहार डोक्यावर झाल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आणि घरातच कोसळली. मात्र, घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाचा संशय अधिकच गडद झाला. रविवारी सकाळी पोलिसांना माहिती रविवारी सकाळी मुलगी घरात बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी केली असता मुलगी ज्या ठिकाणी पडली होती, त्या परिसराची साफसफाई करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती आणि कुटुंबीयांकडून सांगण्यात आलेली माहिती यांची पडताळणी सुरू केली. घटनास्थळी रक्ताचे डाग किंवा अन्य महत्त्वाचे पुरावे दिसून येत नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घराची बारकाईने तपासणी करून विविध ठिकाणांहून नमुने आणि संभाव्य पुरावे गोळा करण्यात आले. आई-वडिलांची स्वतंत्र चौकशी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली. घटनेच्या वेळी नेमके काय घडले, मुलगी कशी जखमी झाली, पोलिसांना माहिती देण्यास विलंब का झाला आणि घटनास्थळाची साफसफाई कोणी केली, यासह विविध मुद्द्यांवर पोलिसांनी कसून चौकशी केली. दिवसभर सुरू असलेल्या चौकशीनंतर वडिलांनी मुलीच्या डोक्यात लाकडी बॅटने प्रहार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या घटनेप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, फॉरेन्सिक तपास आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, मुलीच्या मृत्यूमागे नेमकी परिस्थिती काय होती, प्रहार किती वेळा करण्यात आला, गंभीर जखमी झाल्यानंतर तिला वैद्यकीय उपचार का मिळाले नाहीत आणि घटनेनंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न का करण्यात आला, या सर्व बाबींचा पोलिस तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे गोडोली परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणातील पुढील तपास सातारा शहर पोलिसांकडून सुरू आहे हेही वाचा… मालेगावमध्ये धरणाच्या पाण्यात बाप-लेकांसह तिघांचा बुडून मृत्यू:मेंढ्यांना पाणी पाजताना काळाचा घाला मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे घडली. दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने कजवाडे गावावर शोककळा पसरली आहे. पावसाअभावी परिसरातील नदी, नाले आणि ओढे कोरडे पडल्याने मेंढ्यांना पाणी मिळावे यासाठी हे कुटुंब धरणाकडे गेले होते. मात्र, याच ठिकाणी दुर्दैवी दुर्घटना घडली. सविस्तर वाचा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *