विकसित भारताचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते:पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधव यांचा विश्वास




पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली राजकीय तयारी वेगाने सुरू केली आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. स्मिता जाधव आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते’ भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. स्मिता जाधव यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख केला. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेशाची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांचे आभार मानते,’ असे जाधव यांनी म्हटले. देशाच्या विकासाच्या प्रवाहात आपलेही योगदान असावे, या उद्देशाने आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला पक्षाकडून काम करण्याची मोठी संधी मिळाली असून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने जबाबदारीही वाढली आहे, असे जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर माझी जन्मभूमी, तर पुणे माझी कर्मभूमी आहे, असे सांगत त्यांनी पुण्याशी असलेल्या आपल्या नात्याचाही उल्लेख केला. ‘उमेदवारीसोबत मोठी जबाबदारी’ पदवीधर मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आता जाधव यांच्यासमोर आहे. शिक्षण, रोजगार आणि युवकांशी संबंधित प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील कामामुळे डॉ. स्मिता जाधव यांची स्वतंत्र ओळख असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘पक्षासोबत राहणे ही शिस्त’ पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारीनंतर पक्षातील शिस्तीचा मुद्दा मांडला. निवडणुकीसाठी अनेक जण तयारी करत असतात; मात्र पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी पक्षासोबत राहणे हीच पक्षशिस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड यांनीही तयारी केली होती आणि त्याच्या तयारीचा आपण साक्षीदार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मात्र आता पक्षाने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली असून सर्वांनी एकत्रितपणे निवडणुकीच्या मैदानात काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीला कमी कालावधी शिल्लक असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान आहे. पुढील काही दिवसांत दोन्ही उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि संपर्क अभियान राबवावे लागणार आहे. पहिल्या पसंतीचे मत मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, असेही चव्हाण यांनी सांगितले. ‘दोन्ही मतदारसंघ खेचून आणू’ पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले कौस्तुभ गावडे यांनीही भाजप नेतृत्वाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन गेल्या सहा वर्षांपासून आपण भाजपमध्ये काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ आम्ही खेचून आणू, असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आपण पाचही जिल्ह्यांमध्ये दौरे केले असून मतदारांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आगामी काळात या संपर्काचा फायदा निवडणुकीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्यावर जबाबदारी सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे त्यांनी आभार मानले. भाजपसमोर आता विजयाचे आव्हान दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने दोन्ही मतदारसंघांमध्ये संघटनात्मक ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांना कमी कालावधीत मोठ्या संख्येने मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यामुळे पक्षसंघटना, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या निवडणूक तयारीला आणखी वेग आला असून, दोन्ही मतदारसंघांमध्ये पक्ष आपली ताकद कितपत वाढवतो आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे ‘हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न:देवेंद्र फडणवीसांचा टोला, निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा विरोधकांकडून करण्यात येणारा आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चावरही फडणवीसांनी टीका करत हा मोर्चा म्हणजे “हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न” असल्याचं म्हटलं. तसेच विरोधकांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि 2026 मधील SIR प्रक्रियेचा संदर्भ देत विरोधकांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *