नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील विविध भागांत आज, शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.४३ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे. सेवालाल चौक, नमस्कार चौक, आनंदनगर, लातूर फाटा तसेच वजिराबाद परिसरातील नागरिकांनीही हादरे जाणवल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर तसेच भूकंप नोंदविणाऱ्या ऍप वरील उपलब्ध माहितीनुसार हिंगोली परिसरात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप, ७ किलोमीटर खोलीवर नोंद झाल्याचे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. या भूकंपाची वेळ सकाळी ७.४६ वाजून ४८ सेकंद अशी दाखविण्यात आली असून त्याचे स्थान हिंगोली, महाराष्ट्र असे नमूद आहे. मात्र, नांदेडमध्ये सकाळी ९.४३ वाजता जाणवलेल्या धक्क्याची अधिकृत तीव्रता आणि केंद्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नांदेड शहर आणि परिसरात यापूर्वीही वेळोवेळी भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले आहेत. त्यामुळे आजच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. काही नागरिकांनी घरातील वस्तू हलल्याचे, तर काहींनी जमिनीला कंप जाणवल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून अधिकृत माहिती घेतली जात आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या उपलब्ध नोंदीत महाराष्ट्रातील आजच्या काही भूकंपांची नोंद आहे; मात्र नांदेडजवळील या घटनेबाबत अधिकृत पुष्टी मिळणे बाकी आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावे. भूकंपाचे हादरे पुन्हा जाणवल्यास इमारतीत असल्यास लिफ्टचा वापर न करता सुरक्षित ठिकाणी जाणे आणि अफवा किंवा अप्रमाणित माहिती पसरवणे टाळणे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिकृत माहिती प्राप्त होताच भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि इतर तपशील स्पष्ट होणार आहेत.
