पंचनाम्यासाठीच्या पथकाला परत पाठवले:गेवराई पायगा येथील घटना, दुष्काळ जाहीर असताना पंचनामे कशासाठी; शेतकऱ्यांचा सवाल‎




फुलंब्री तालुक्यात दुष्काळ जाहीर असतानाही प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप आहे. याच रागातून गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आलेल्या महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पाहणी पथकाला शुक्रवारी माघारी धाडले. फुलंब्री तालुक्यात राज्य सरकारने आधीच तालुका दुष्काळी घोषित केला आहे, मग प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र पंचनामा कशासाठी केला जात आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. कोणत्याही शेतकऱ्याचा वैयक्तिक पंचनामा न करता, संपूर्ण गावाला आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना पंचनाम्याची कारवाई न करताच माघारी फिरावे लागले. दरम्यान, राज्य सरकारने आधीच सरसकट दुष्काळ जाहीर केला आहे, मग आता पुन्हा पंचनामे कशासाठी? हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा रोष आहे. याच भावनेतून मी सरपंच म्हणून माझ्या गावात पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाला परत पाठवले असल्याचे सरपंच मंगेश साबळे यांनी सांगितले. इतर गावांतही पंचनामा पथकांना विरोध : केवळ गेवराई पायगाच नव्हे, तर फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव आणि आडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनीही प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला. तेथेही पाहणीसाठी आलेल्या पथकांना शेतकऱ्यांनी कोणतीही माहिती न देता परत पाठवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *