नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कार्यालयात साध्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी नागरिकांना किती हेलपाटे मारावे लागतात आणि त्याच प्रक्रियेला कमाईचे साधन बनविण्याचा प्रकार कसा चालतो, याचा धक्कादायक नमुना नांदेडमध्ये समोर आला आहे. अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील १ लाख २० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित कनिष्ठ लिपिक आणि त्याचा खाजगी मध्यस्थ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकले. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, विशेष न्यायाधीश तुषार आगलावे यांनी दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात एका ३२ वर्षीय कंत्राटदाराने पेट्रोल पंपाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे सादर केली होती. मात्र, या प्रक्रियेत वारंवार त्रुटी काढल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदाराची भेट हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे काम पाहणाऱ्या खाजगी अभियंता सतीश मधुकर वाघोळे यांच्याशी झाली.
वाघोळे यांनी कथितरित्या मध्यस्थाची भूमिका बजावत, त्रुटी न काढता एनओसी लवकर हवी असल्यास कनिष्ठ लिपिक सुकेश भीमराव नहारे यांना २ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे.
लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी कारवाईपूर्व पडताळणी केली. यादरम्यान सतीश वाघोळे याने फोनवरून सुकेश नहारे यांच्याशी संपर्क साधला. या संभाषणात, तुम्ही माझ्यासाठी चार आणेही खर्च केले नाहीत, साधा चहाही पाजला नाही, असा कथित संवाद झाल्याचे तपासात समोर आले.
आम्ही तुम्हाला डिव्हिजन कव्हर करून देणार आहोत; मात्र मला यात काहीच उरत नाही,अशा आशयाची चर्चा झाल्याचेही एसीबीकडून सांगण्यात आले. या संभाषणातून लाचेच्या मागणीला कथित संमती मिळाल्यानंतर सापळा कारवाईची तयारी करण्यात आली.
अडीच लाख रुपयांच्या मागणीपैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५७ मिनिटांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेडच्या आवारात एसीबीने सापळा रचला.आज पोलिस निरीक्षक माधुरी यावलीकर अणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले। तपसाच्या प्रगतीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली.न्या.तुषार आगलावे यांनी ती विनंती मान्य केली.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी मध्यस्थ सतीश वाघोळे याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर लोकसेवक सुकेश नहारे यांनाही ताब्यात घेण्यात आले. भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला लाचेचा दर लावल्याचा आरोप आणि चहा-पाण्यापासून लाखोंच्या मागणीपर्यंत पोहोचलेला हा प्रकार शासकीय यंत्रणेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.
संबंधित बातमी ….

Post Views: 256
