गोपाल उपाध्याय: विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त रुजवा.:गुरुकुंज येथील जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन.
![]()
तिवसा: जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरावे, असे आवाहन गोपाल उपाध्याय यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर डॉ. दिंगाबर निंघोट, वाडेकर नॅशनल स्कूलचे संचालक डॉ. रघुनाथ वाडेकर, श्री गुरुदेव विद्या मंदिरचे प्राचार्य मनोज कडू, माधुरी नीमकर आणि पत्रकार हेमंत निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपाध्याय यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांना शिस्त, नैतिक मूल्ये, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम करत असल्याचे नमूद करत, त्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. व्यसनमुक्त जीवन, पालकांचा आदर, शिक्षकांविषयी सन्मान आणि देशभक्तीची भावना जोपासण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले. शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी पारंपरिक पांढऱ्या वेशभूषेत व भगव्या टोपीत शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले दिसून आले. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर भाषण लक्षपूर्वक ऐकत विविध प्रश्न विचारून आपली उत्सुकता व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या संस्कार शिबिरामध्ये प्रार्थना, प्रेरणादायी विचार, सामूहिक उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित विविध कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारची शिबिरे काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, शिक्षक व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण होऊन शिस्तबद्ध जीवन जगण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल कडू यांनी केले, तर आभार मानव सेवा छात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी मानले. यावेळी कोषाध्यक्ष महादेव बेले, गोपाल कसर, धनश्री खंडारे, दिनेश हगवणे, गोपाल भालचक्र, ओकार पेंदोर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री गुरुदेव कलामंच सेवा मंडळातर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये श्रावणी सचिन चव्हाण, तुषार किशोर मुंगले, सिद्धी स्वप्निल साबळे, पुनम रवींद्र मोरे, कृष्णाई विजय धोटे, मनस्वी गजेंद्र कठाळे, ओम निलेश बालपांडे, उन्नती निलेश हगवणे, श्रावणी श्रीकृष्ण तिरमारे, अनुष्का दिनेश हगवणे, सृष्टी अविनाश तिखे, समीक्षा प्रभाकर जाधव आणि चंचल इंगळे यांचा समावेश होता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरवून या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
