पेट्रोल-डिझेल वाचवण्यासाठी अमरावती विद्यापीठाचा निर्णय:शनिवारपासून 'नो व्हेईकल डे', ऑनलाइन अध्यापनही सुरू
![]()
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या संभाव्य तुटवड्याची शक्यता लक्षात घेता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्धार केला असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, विद्यापीठाने विविध उपाययोजना राबवण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सहविचार सभेत ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. बारहाते यांनी सांगितले की, देशाच्या विकास कार्यात योगदान देण्यासाठी आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठ काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. ‘नो व्हेईकल डे’ हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या दिवशी विद्यापीठ परिसरात पेट्रोल किंवा डिझेलची वाहने आणण्यास मनाई असेल. केवळ सायकल, ई-बाईक किंवा सार्वजनिक बसनेच विद्यापीठात येता येईल. दिव्यांग कर्मचाऱ्यांना मात्र या नियमातून वगळण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने केवळ ‘नो व्हेईकल डे’वरच न थांबता, पुढील सहा महिन्यांसाठी कारपूलिंग आणि शेअरिंगचाही आग्रह धरला आहे. एकाच भागातून येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकाच वाहनाचे शेअरिंग किंवा कारपूलिंग करण्याचा प्रयत्न करावा, असेही या सभेत ठरले. याबाबत विद्यापीठाच्या प्रशासन विभागाने तातडीने परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांना कळवले आहे. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सर्वांना काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख आणि समन्वयक उपस्थित होते. याशिवाय, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांचे महिन्यातील सर्व शनिवारचे शैक्षणिक कामकाज ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. विविध प्राधिकारिणींच्या बैठका तसेच विद्यापीठाच्या विविध विभागांतर्गत होणाऱ्या सर्व समित्या आणि उपसमित्यांच्या बैठका प्रत्यक्ष घेण्याऐवजी ऑनलाइन किंवा आभासी पद्धतीने घेण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.
