Pune crime | आंदेकर टोळीसंदर्भात पोलीस आयुक्तांनी घेतला ‘तो’ मोठा निर्णय!

0
Andekar-Gang-1.webp.webp


Pune crime | पुणे शहरात पुन्हा एकदा वाढलेल्या टोळीयुद्धामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आंदेकर टोळी कारागृहात असतानाही शहरातील गुन्हेगारी हालचालींवर नियंत्रण ठेवत असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हत्या, हल्ले आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांचे नियोजन थेट जेलमधून होत असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी राज्य कारागृह प्रशासनाला पत्र पाठवत आंदेकर टोळीतील प्रमुख आरोपींवर विशेष निर्बंध लावण्याची मागणी केली आहे. या टोळीच्या हालचालींमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्येनंतर शहरातील टोळीयुद्ध अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणातील आरोपींशी संबंधित व्यक्तींना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. अलीकडेच धनकवडी परिसरातील बालाजी नगर आणि खडी मशीन चौक येथे दोन गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी अक्षय म्हस्के याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Pune crime | कारागृह प्रशासनाला विशेष सूचना :

या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना आंदेकर टोळीचे कारागृहातून चालणारे नेटवर्क समोर आले. टोळीतील काही आरोपी जेलमध्ये असतानाही बाहेरील साथीदारांशी संपर्क साधून गुन्ह्यांचे नियोजन करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. धमक्या देणे, विरोधकांवर हल्ल्यांची रणनीती आखणे आणि टोळीतील सदस्यांना निर्देश देणे असे प्रकार कारागृहातूनच सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आंदेकर टोळीतील प्रमुख आरोपींना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवावे, त्यांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणावेत आणि कारागृहातून फोनसह कोणताही संपर्क साधता येणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच न्यायालयीन सुनावणीसाठी आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सध्या टोळीचा प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हा (Dhule) जिल्हा कारागृहात बंद आहे. तर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर याला (Nandurbar) कारागृहात ठेवण्यात आले आहे. या दोघांवर खून, खंडणी, धमकी आणि संघटित गुन्हेगारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात आंदेकर टोळीविरोधात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News title : Pune Police Tighten Grip On Gang

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *