रमाई साहित्य संमेलन 30 मे रोजी:रमणी सोनवणे अध्यक्ष; पुणे येथे एकदिवसीय आयोजन
![]()
महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवार, ३० मे २०२६ रोजी पुणे येथे एकदिवसीय ‘रमाई साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवयित्री, लेखिका, व्याख्याती आणि अभिनेत्री रमणी सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि स्मारकाच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला ॲड. नितीन घोडके, ॲड. क्षितिज खरात, संजोग कांबळे, माजी नगरसेविका लताताई राजगुरू आणि श्रीमंत कोतले आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून होईल, असे विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर वाडिया कॉलेज शेजारील रमाई राष्ट्रीय स्मारक येथे सर्वधर्म प्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. सकाळच्या सत्रात ‘मी राजगृहातील रमाई बोलते’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला जाईल. प्रा. रमणी सोनवणे (पुणे) या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. दुपारच्या सत्रात ‘रमाई आणि भीमराव यांच्या लेकरांचे कवी संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे, ज्यात लोककवी भगवान धेंडे यांच्यासह इतर कवी सहभागी होतील. सायंकाळच्या सत्रात संमेलनाध्यक्ष प्रा. रमणी सोनवणे यांचे अध्यक्षीय भाषण, ठराव वाचन आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गुणगौरव समारंभ होईल. तसेच, ‘आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ यांच्या वतीने कविता, गझल आणि गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वरांजली संगीत समूहाकडूनही विशेष गीत-संगीत रजनी सादर केली जाईल. पहिल्या रमाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या प्रा. रमणी सोनवणे या विद्रोही कवयित्री, लेखिका, व्याख्याती, अभिनेत्री आणि माणूसपणाच्या समतावादी चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए. नेट पॉलिटिकल सायन्स असून, त्या सध्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे कार्यरत आहेत. वयाच्या १६ व्या वर्षांपासून त्या चळवळीत अभिनय, लेखन आणि कवितांच्या माध्यमातून मनपरिवर्तन आणि महामाता, महापुरुष यांचे विचार सर्व समाज स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. ‘सावित्रीबाई फुले’, ‘होय मी राजगृहातील रमाई बोलतेय’ आणि ‘मी तुमची राजमाता जिजाऊ’ आदी एकपात्री कार्यक्रमांचे त्या सादरीकरण करतात. गोरगरीब मुलांसाठी मोफत शिकवणी तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मराठी, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि समाजशास्त्र या विषयांचे मार्गदर्शनही त्या करतात, असे गायकवाड यांनी नमूद केले.
