'जुळली गाठ गं' मालिकेत रंगणार थरार:‘उंचीची प्रचंड भीती, पण धैर्यचा शब्द पाळण्यासाठी सावीने अखेर फोडलीच दहीहंडी!’

[ads1]


महाराष्ट्रात सध्या सर्वत्र दहीहंडीचा मोठा जल्लोष पाहायला मिळत असतानाच, ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जुळली गाठ गं’ मध्येही हा उत्साहाचा थरार रंगणार आहे. मालिकेत सध्या अत्यंत रंजक वळण आले असून सावीची ही थरारक हंडी प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. मालिकेतील थरारक वळण कथानकानुसार धैर्य आणि सावी यांना घराबाहेर पडावे लागले असून, दोघेही सध्या घरखर्चासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. अशातच त्यांच्या आवारात दहीहंडीची स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यात मोठी रक्कम जिंकण्याच्या उद्देशाने धैर्य सहभागी होतो. मात्र, हंडी फोडायला गेलेल्या धैर्यला अचानक चक्कर येते आणि तो खाली पडतो. धैर्यने दिलेला शब्द मोडू नये आणि कुटुंबाला मदत व्हावी, यासाठी सावी स्वतः दहीहंडीच्या थरावर चढून हंडी फोडण्याचा धाडसी निर्णय घेते. अभिनेत्री पायल मेमाणेचा प्रत्यक्ष सेटवरील थरारक अनुभव सावीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पायल मेमाणे हिच्यासाठी हा प्रसंग खूपच आव्हानात्मक होता. आपल्या या अनुभवाबद्दल सांगताना पायल म्हणाली, “मला उंचीची प्रचंड भीती वाटते आणि मी आयुष्यात कधीच हंडी फोडली नव्हती. सेटवर खरोखरच थरावर थर रचून दहीहंडी बांधली होती. मला सेफ्टी बेल्ट लावून वर पाठवले होते, पण वरून खाली पाहिल्यावर मी खूप घाबरले. सर्व थर खाली उतरल्यावर मी वर एकटीच लटकत राहिले होते, त्यामुळे भीती आणखीच वाढली. परंतु आमचे दिग्दर्शक आणि गोविंदा पथकाने मला खूप धीर दिला. अखेर मी स्वतःच्या भीतीवर मात करत हंडी फोडलीच.” गोविंदा पथकांना आवाहन या अनुभवानंतर गोविंदांबद्दलचा आदर आणखी वाढल्याचे सांगत पायल म्हणाली, “प्रत्येक गोविंदाच्या निर्धास्तपणाला माझा सलाम आहे. सर्व गोविंदा पथकांनी खूप धमाल करावी, पण स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी. हा सण उत्सव म्हणून साजरा करा, स्पर्धा म्हणून नको.” सावीचा हा धाडसी आणि थरारक अवतार पाहण्यासाठी प्रेक्षकांना ‘जुळली गाठ गं’ ही मालिका सन मराठीवर दररोज रात्री 8:30 वाजता पाहता येणार आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *