शिवसेना फुटल्याचे खापर माझ्यावर फोडू नका:बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; कॅबिनेट मंत्रीपदावर फसवणूक केल्याचा आरोप

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-23t15_1779530522.png




सत्ताधारी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना त्यांनी कॅबिनेट मंत्री केले. मला केवळ राज्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागेल, असे ते अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर फसवणुकीचा आरोप करताना म्हणालेत. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी व धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या तिकिटावर विधान परिषदेवर जाणाऱ्या बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. बच्चू कडूला घरी बोलावन मंत्री केले ही माझी चूक झाली. तो जुना शिवसैनिकच होता. पण लोभापायी गेला त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले. नेमके काय म्हणाले बच्चू कडू? बच्चू कडू म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात मला राज्यमंत्रीपद दिले. माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले. एकनाथ शिंदेंनीच माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून दिली होती. मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. आमच्या मतांमुळेच ते मुख्यमंत्री झाले. त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आ्हाला संख्याबळासाठी गळ घातली होती. ठाकरेंनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले नाही. त्यांनी माझ्याऐवजी गडाखांना ते दिले. उद्धव ठाकरे माझ्याविषयी जे काही बोलले ते मनापासून बोलले असे वाटत नाही. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले. मग आम्ही चूक केली असे म्हणणार का? मी गुवाहाटीला जातानाही उद्धव ठाकरे यांना विचारले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना फुटीचे खापर माझ्या डोक्यावर फोडू नये, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू शिंदे गटाकडून विधान परिषदेवर उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार होते. त्यानंतरही त्यांची ठाकरे मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. पण एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी त्यांना साथ दिली होती. ते महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी थांबलेल्या गुवाहाटीतील हॉटेलात गेले होते. यामुळे उद्धव यांना जबर धक्का बसला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी आपली प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करून विधान परिषदेची आमदारकी मिळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed