Petrol Diesel Price | सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार? पेट्रोल-डिझेल दरवाढीवर RBI ने दिला ‘हा’ इशारा
Petrol Diesel Price | मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत असून, पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दिला आहे. युद्ध दीर्घकाळ चालल्यास देशात महागाईची दुसरी लाट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
इस्त्रायल (Israel), इराण (Iran) आणि त्यानंतर अमेरिका (America) इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाला आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या तणावाचा कोणताही ठोस शेवट अद्याप दिसत नसल्याने कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. मागील दहा दिवसांत इंधन दरात तीनवेळा वाढ झाल्याने सामान्य नागरिकांच्या खर्चात भर पडली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, जर मध्य-पूर्वेतील परिस्थिती आणखी बिघडली तर भारतासह अनेक देशांना ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या किंमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम वाहतूक आणि उद्योग क्षेत्रावर होईल. यासोबतच रुपयावर दबाव वाढण्याची आणि व्यापार तुटीचा फटका बसण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
Petrol Diesel Price | महागाईची दुसरी लाट येणार?
केंद्रीय बँकेने महागाईच्या संदर्भातही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. इंधन महागल्याने मालवाहतूक खर्च वाढेल आणि त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते, असे RBI ने नमूद केले आहे. पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यास किरकोळ बाजारातील दर आणखी वाढतील, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
काही आर्थिक तज्ज्ञांच्या मते, महागाई नियंत्रणाबाहेर गेल्यास परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेऊ शकतात. त्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. 2021 ते 2025 या कालावधीत भारताचा आर्थिक विकासदर सरासरी 8.2 टक्के राहिला होता. मात्र RBI ने 2026-27 साठी सुमारे 6.9 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या महागाई 4 टक्क्यांच्या आसपास असली तरी ऊर्जा संकट अधिक तीव्र झाल्यास आर्थिक परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
