
केंद्र सरकार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचा विचार करत आहे. परंतु, या निर्णयाला कोल्हापुरातून जोरदार विरोध होत आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला हरकत नोंदवण
.
सतेज पाटील म्हणाले, ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याची आयडिया कोणाच्या डोक्यातून आली हे कळायला मार्ग नाही. लोकांना आधीच हमीभाव नाही. त्यामध्ये आता हा 25000 पर्यंत आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे आम्ही ईडीआर आणि जीपीएस बनवणारी कोणती कंपनी आहे का? याबाबत माहिती घेतली पण अद्याप त्याची माहिती मिळाली नाही. ते म्हणाले की या निर्णयावर अधिसूचना काढण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की ईडीआर आणि जीपीएस ट्रॅक्टरवर लावायची काही गरज आहे का? 18 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी हरकती नोंदवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की निर्णय होण्यापूर्वीच हरकती व्हाव्यात याबाबत आम्ही आवाहन करत आहोत. हा विषय देशव्यापी असल्याने आम्ही आतापासून शेतकऱ्यांना आवाहन करत आहे.
पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, दिल्लीत एसी कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत. आमचा बळीराजा शेतात राबतो, महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही. त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणे हा थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा घालण्यासारखेच आहे.
आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही. सरकारने वास्तवाचे भान ठेवून ही जाचक अधिसूचना तत्काळ रद्द करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.