महापालिका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, ९ जणांवर गुन्हा:खंडणी मागितल्याचा आरोप; अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई

0
410f978d-ce99-42f9-aaef-262328280620_1779353485042.jpg




पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्रास दिल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली नऊ जणांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्च २०२६ रोजी पुणे महापालिकेच्या आवारात घडली. विभागीय अतिक्रमण अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ऋषिकेश अभिमान सावंत, सुनिल जयवंतराव पवार, उमेर मैनुद्दीन शेख, राजेंद्र विलास जाधव, रमेश विष्णु खामकर, शंकर किन्नु ठाकूर, मिलिंद जाधव, नागुबाई ऊर्फ मीनाताई सिद्धप्पा धोत्रे आणि कविता विनयकुमार पटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अधिकारी शासकीय कर्तव्य बजावत असताना ऋषिकेश सावंत यांनी त्यांना अडवून जातीवाचक शिवीगाळ केली आणि ‘तुझी नोकरी खातो’ अशी धमकी दिली. यानंतर सुनिल पवार आणि इतरांनी त्यांच्या हितसंबंधातील व्यक्तींच्या रस्त्यावरील बेकायदेशीर स्टॉल्सवर कारवाई होऊ नये यासाठी अधिकाऱ्यावर दबाव आणला. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विविध शासकीय विभागांकडे खोटे तक्रार अर्ज दाखल करून त्यांना त्रास देण्यात आला. तसेच, अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारी मागे घेण्यासाठी १० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय, कविता पटेकर यांनी दिव्यांगत्वाचा फायदा घेत मनपा भवनाबाहेर वारंवार आंदोलने करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करून अधिकाऱ्यांची बदनामी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed