यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता
![]()
कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असा कानमंत्र सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला. “लोकरंग’तर्फे आयोजित तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे, अॅड. सुधाकर खुमकर, प्रभात किड्सच्या संचालिका वंदना नारे, प्राचार्य प्रदीपसिंह राजपूत, प्रा. डॉ. ममता इंगोले, नीरज आवंडेकर, डॉ. संदीप चव्हाण, श्रीकांत पागृत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड. सुधाकर खुमकर यांनी प्रास्ताविकातून ‘लोकरंग’ संस्थेची सांस्कृतिक, कलाविषयक भूमिका स्पष्ट केली. तसेच ‘लोकरंग’तर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत भविष्यातील सांस्कृतिक योजनांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले. मान्यवर, पालक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आभारही त्यांनी मानले. समारोप समारंभाला पालक व नागरिक उपस्थित होते. यशासाठी ऊर्जा, सातत्य गरजेचे : अभिनेते अंकुर वाढवे म्हणाले की, कलाक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ऊर्जा, सातत्य व सकारात्मकता कायम ठेवावी लागते. ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी विद्यार्थी व पालकांना अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळण्यासाठी ‘लोकरंग’ भविष्यातही विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
