आष्टीकर, वाजेंनंतर आता भाऊसाहेब वाकचौरे!:शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या शिंदेंच्या मंत्र्यांसोबत भेटी सुरूच; चर्चेला उधाण

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-19t191300067_1779198235.jpg




राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी महायुतीच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटींनंतर, आता वाकचौरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अत्यंत विश्वासू नेत्यांची भेट घेतल्यामुळे ठाकरेसेनेचे खासदार सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे त्यांच्या क्षेत्रातील एमआयडीसीच्या प्रलंबित कामांनिमित्त उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले जात असले, तरी समन्वय समितीची बैठक उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही आणि त्यांना न भेटताच माघारी परतावे लागले. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत असून, ते लवकरच शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे दावे सत्ताधारी नेत्यांकडून वेळोवेळी केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी सत्ताधारी मंत्र्यांची घेतलेली प्रत्येक सदिच्छा भेट आता केवळ प्रशासकीय न ठरता, तिला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त होत असल्याने राजकीय वर्तुळातील सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. दोन खासदारांनी घेतली होती एकनाथ शिंदेंची भेट यापूर्वी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट, तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची केलेली भेट ही विकासकामे आणि मतदारसंघाच्या निधीसंदर्भात असल्याचे संबंधित खासदारांकडून सांगण्यात आले होते. मात्र असे असले तरी, ऐन राजकीय घडामोडींच्या काळात झालेल्या या लागोपाठच्या भेटींमागे सत्ताधाऱ्यांची एखादी मोठी राजकीय रणनीती किंवा ऑपरेशन टायगरचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अजूनही कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *