बंगल्यातून 27 लाखांचे दागिने लंपास:घर कामगार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल, कात्रज-कोंढवा परिसरातील घटना
![]()
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्यातून २७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आनंदतीर्थ सोसायटीत घडली असून, येवलेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कृष्णकुमार चंद (वय २५) आणि त्याची पत्नी सीता (वय २३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दाम्पत्य मूळचे नेपाळचे रहिवासी आहे. एका ज्येष्ठ महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे कुटुंबीय कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील आनंदतीर्थ सोसायटीतील बंगल्यात राहतात. आरोपी दाम्पत्याने कुटुंबातील सदस्यांचे लक्ष नसताना शयनगृहातील कपाटातून रोकड आणि दागिने असा एकूण २७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरला. चोरी केल्यानंतर हे दाम्पत्य फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक एस. पठाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रवासी महिलेच्या पिशवीतून १५ लाख रुपयांचे दागिने चोरीला दरम्यान, हडपसर परिसरात एका प्रवासी महिलेच्या पिशवीतून १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची दुसरी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खराडी येथील ४६ वर्षीय ज्येष्ठ महिलेने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला कर्नाटकात एका विवाह समारंभासाठी गेली होती आणि आराम बसने पुण्याकडे परतत होती. महिलेने हिरेजडीत सोन्याचे दागिने एका पिशवीत ठेवले होते. हडपसर येथील थांब्यावर बसमधून उतरल्यानंतर त्यांना आपल्या पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक एन. मुलाणी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
