गाडीत डिझेल नाही, मुलीला कसे शोधणार?:बेपत्ता मुलीला शोधण्याची मागणी करणाऱ्या कुटुंबाला नागपूर पोलिसांचे उत्तर; काँग्रेसचा घणाघात

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-18t15_1779099402.png




एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी गाडीत डिझेल नसल्यामुळे तिला शोधण्याची जबाबदारी झटकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. देशाला अमृतकालची स्वप्ने दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीत आज पोलिस स्टेशनची गाडी डिझेल अभावी बंद पडतेय. हा अमृतकाल नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचा काळ आहे, अशी टीका काँग्रेसने या प्रकरणी केली आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक मुलगी नुकतीच बेपत्ता झाली आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पण पोलिसांनी ‘गाडीत डिझेल नाही, त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही’, असे कारण देत मुलीचा शोध घेण्यास नकार दिला. कुटुंबीयांच्या मते, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आमच्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. या प्रकरणी पोलिसांकडून तत्पर कारवाई अपेक्षित होती. पण मुलगी 21 वर्षांची असल्यामुळे ती तिचे निर्णय घेऊ शकते, तिला कुठे जायचे ते जाऊ शकते, असे सांगत पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवली नाही. पोलिसांच्या या बेजबाबदारपणावर आता स्थानिक नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. मुलींच्या सुरक्षेवर मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात त्यांचा शोध घेण्यासाठी आवश्यक मुलभूत सुविधांचाच अभाव आहे. या परिस्थितीत नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. हा अमृतकाल नव्हे, व्यवस्थेच्या अपयशाचा काळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकार व पोलिस प्रशासनावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, नागपूरसारख्या उपराजधानीत एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता होते आणि पोलिसांचं उत्तर काय? गाडीत डिझेल नाही, शोधायला कसं जाणार? हा फक्त बेजबाबदारपणा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचं दिवाळं निघाल्याची कबुली आहे. नागपूर पोलिसांच्या गाडीत डिझेल नसेल तर मग राज्यात रुग्णवाहिका पासून इतर अत्यावश्यक सुविधांची काय अवस्था आहे याचे हे विदारक चित्र आहे! भाजपच्या जाहिरातींमध्ये सुरक्षित महाराष्ट्र दाखवला जातो, पण वास्तवात पोलिसांकडे बेपत्ता झालेली मुलगी शोधायला डिझेलसुद्धा नाही?! राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे हजारो कोटींचे इव्हेंट, सेल्फी, प्रचार आणि पीआरसाठी पैसा आहे, पण नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाही? मग ते बाईकवरून प्रवास केल्याचा काय उपयोग झाला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचे आवाहन केले ते पोलिसांनाही लागू केलं का? मुली बेपत्ता असताना सुद्धा डिझेल वाचवणे महत्वाचे वाटते का? गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही अवस्था असेल तर संपूर्ण राज्यात विचारण्याची सोय नाही. देशाला अमृतकालची स्वप्नं दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीत आज पोलीस स्टेशनची गाडी डिझेलअभावी बंद पडतेय. हा अमृतकाल नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचा काळ आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed