नाशिकच्या मालेगावात घटसर्प रोगामुळे दोन बालकांचा मृत्यू:नागरिकांमध्ये भीतीचे सावट, आरोग्य यंत्रणा हादरली

0
new-project-2026-05-17t163823108_1779016174.jpg




गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातून आता आरोग्य क्षेत्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगाव शहरात ‘घटसर्प’ या गंभीर आजाराने दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून हा आजार जवळपास हद्दपार (कालबाह्य) झाल्याचा दावा केला जात असताना आणि लसीकरणावर मोठा निधी खर्च होत असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लसीकरणानंतरही दोन बालकांचा मृत्यू झाल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर आणि कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत पावलेली दोन्ही बालके गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावात वास्तव्यास असलेल्या एका मूळ राजस्थानी कुटुंबातील होती. शासनाच्या नियमांनुसार बालकांचे लसीकरण झाले असतानाही त्यांना या आजाराची बाधा कशी झाली? आणि त्यात त्यांचा मृत्यू कसा झाला? या प्रश्नाने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न या दुर्दैवी घटनेमुळे मालेगाव शहरात घबराट पसरली असून, आरोग्य विभागाच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मालेगावात आरोग्याचे प्रश्न नेहमीच गंभीर राहिलेले आहेत. कधीकाळी कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या या शहरात टायफाईड, डेंग्यू, मलेरिया आणि डायरिया यांसारखे आजार नित्याचेच झाले आहेत. अशा परिस्थितीत, आता थेट ‘घटसर्प’सारख्या घातक आजाराने दोन बालकांचा बळी घेतल्यामुळे महापालिका प्रशासन आणि वरिष्ठ आरोग्य यंत्रणेने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नेमका काय आहे घटसर्प रोग? दरम्यान, घटसर्प या रोगाबाबत जनजागृतीची गरजही या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांमध्ये आढळणारा हा संसर्गजन्य आजार धोकादायक ठरू शकतो. विशेषतः गाई आणि म्हशींमध्ये त्याची लक्षणे दिसून येतात. वेळीच लसीकरण आणि उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने आणि प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *